सिरम इन्स्टिट्यूटमधील आगीत पाच जणांचा मृत्यू - Five die in fire at Serum Institute In Pune | Politics Marathi News - Sarkarnama

सिरम इन्स्टिट्यूटमधील आगीत पाच जणांचा मृत्यू

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 21 जानेवारी 2021

सिरम इन्स्टिट्यूटला आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आग लागली होती. मांजरी येथील कंपनीच्या इमारतीला बीसीजी लस ज्या ठिकाणी तयार केली जाते त्या ठिकाणी ही आग लागली होती.

मुंबई : पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट इमारतीला लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत दिली. वेल्डिंगचे काम सुरू असताना उडालेल्या ठिणग्यांमुळे ही आग लागल्याचेही टोपे यांनी सांगितले. सहा मजली असलेल्या या इमारतीत मोठे स्वरूप धारण केले. चार लोक अडकल्याची माहिती मिळाली होती. आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाचे पंधरा बंब गेले होते. आग विझल्यानंतर सहाव्या मजल्यावर पाच जणांचे मृतदेह आढळले. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनीही या माहितीला दुजोरा दिला. मृत झालेले हे बांधकाम मजूर असण्याची शक्यता मोहोळ यांनी व्यक्त केली. 

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आग लागली होती. मांजरी येथील कंपनीच्या इमारतीला बीसीजी लस ज्या ठिकाणी तयार केली जाते त्या ठिकाणी ही आग लागली होती. कोविशिल्ड लसीचं उत्पादन केलं जात आहे, तो भाग सुरक्षित आहे. आग लागल्यानंतर सर्वजण सुरक्षित असल्याचे सांगितले जात होते. जिवितहानी न झाल्याबद्दल सिरमचे व्यवस्थापकीय संचालक आदर पूनावाला यांनी समाधान व्यक्त केले होते. पण प्रत्यक्षात पाच जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.  

कोरोनाची लस बनवण्याचं काम होत आहे, तो विभाग सुरक्षित आहे. या जागेच्या विरुद्ध बाजूला जे गेट आहे, तिथे ही आग लागली होती. कोव्हिशिल्ड लसीला कोणताही धोका नाही. कोरोना लसीचं काम हे गेट नंबर तीन, चार आणि पाच या परिसरात केले जाते. हा भाग अत्यंत सुरक्षित आहे. आगीचे कारण स्पष्ट झाले नसले तरी कोरोनाची लस ठेवण्यात आलेल्या बिल्डिंग कोणताही धोका नाही, असे सांगण्यात आले. 
 
काही दिवसांपुर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह काही देशांच्या राजदुतांनी सीरम इन्स्टिट्युटला भेट दिली होती. तर काही दिवसांपुर्वीच सीरम इन्स्टिट्युटमधून महाराष्ट्रासह देशाच्या वेगवेगळ्या भागात कोवीशील्ड ही लस पाठविण्यात आली. या सगळ्या घडामोडीमुळे सीरमकडे भारतासह संपूर्ण जगाचे लक्ष वेधले गेले होते. 

सीरम इन्स्टिट्युटमध्ये कोरोना लस निर्मिती केंद्र तसेच अन्य विविध प्रकारच्या लशींचे उत्पादन केले जाते. आग विझविण्याची अत्याधुनिक यंत्रणा असलेल्या ब्रांटो या गाडीलाही तातडीने घटनास्थळी पाठविण्यात आले. होते. अग्निशामक दलाच्या मध्यवर्ती केंद्रासह हडपसर, कोंढवा व अन्य केंद्राच्या गाड्या व जवान आग विझविण्याच्या प्रयत्नात होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या आगीची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले. या आगीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तत्काळ दखल घेऊन पुण्यातील यंत्रणेला आग आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी आगीच्या या दुर्घटनेची विभागीय आयुक्त तसेच मनपा आयुक्तांकडून  माहिती घेतानाच आग आटोक्यात आणण्यासाठी आणि आवश्यकता भासल्यास मदत व अनुषंगिक आपत्कालीन उपाययोजना राबविण्यात याव्यात निर्देश दिले. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान वेळेत पोहचले आहेत. त्यांनी सुरू केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांबाबत समाधान व्यक्त केले आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या प्लँटला लागलेल्या आगीचे वृत्त समजताच मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील संसद सदस्यांच्या समवेत सुरू असलेल्या बैठकीतूनच या घटनेची दखल घेतली व तातडीने कृती करण्याच्या सूचना दिल्या.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख