मुख्यमंत्र्यांची राहुल गांधींसमोरच चलाखी; महिलेनं केली तक्रार अन् सांगितलं भलतंच... - Fisherwoman complains to Rahul Gandhi Puducherry CM tells him shes praising govt | Politics Marathi News - Sarkarnama

मुख्यमंत्र्यांची राहुल गांधींसमोरच चलाखी; महिलेनं केली तक्रार अन् सांगितलं भलतंच...

वृत्तसंस्था
गुरुवार, 18 फेब्रुवारी 2021

मच्छीमार तमिळ भाषेतून बोलल्यानंतर मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी राहुल गांधी यांना इंग्रजीमध्ये भाषांतर करून सांगत होते.

पुदुच्चेरी : काँग्रेस नेते राहुल गांधी दोन दिवसांच्या पुदुच्चेरीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात पहिल्या दिवशी त्यांनी स्थानिक मच्छीमारांशी संवाद झाला. मच्छीमार तमिळ भाषेतून बोलल्यानंतर मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी राहुल गांधी यांना इंग्रजीमध्ये भाषांतर करून सांगत होते. या संवादादरम्यान एका महिलेने थेट मुख्यमंत्र्यांचीच तक्रार केली. पण त्याचे भाषांतर करताना मुख्यमंत्र्यांनी स्वत:चीच स्तुती केल्याचा प्रकार समोर आला आहे.

पुदुच्चेरीमध्ये पुढील काही महिन्यांतच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. यापार्श्वभूमीवर राहुल गांधी दोन दिवस पुदुच्चेरीमध्ये असून विविध घटकांशी संवाद साधत आहेत. तसेच चार आमदारांनी राजीनामा दिल्याने काँग्रेसचे सरकार अल्पमतात आले आहे. त्यामुळे काही महिन्यांवर आलेल्या निवडणुकीआधीच काँग्रेसवर संकट ओढवले आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दौऱ्याच्या पहिल्या दिवशी त्यांनी मच्छीमार बांधवांशी संवाद साधला. यादरम्यान एका महिलेने थेट मुख्यमत्र्यांचीच तक्रार केली. त्यांनी तमिळ भाषेत राहुल गांधींना सांगितले की, ''ते (मुख्यमंत्री) आता इथे आले आहेत. पण जेव्हा चक्रीवादळ आले होते, तेव्हा ते आम्हाला पाहायला इथे आले होते का?'' यावर इतर मच्छीमारांनी टाळ्या वाजवून महिलेने विचारलेल्या प्रश्नाचे समर्थन केले.

टाळ्या वाजल्याने राहुल गांधी यांनाही महिला काय बोलली याची उत्सुकता लागली होती. पण मुख्यमंत्र्यांनी भाषांतर करताना त्यांना वेगळेच सांगितले. ''निवार चक्रीवादळानंतर मी इथे लोकांना भेटलो, त्यांना आधार दिला. असे म्हणत आहे,'' असे भाषांतर करत मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधींसमोर स्वत:ची पाठ थोपटून घेतली. या संवादाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने मुख्यमंत्र्यांची चलाखी उघडी पडल्याचा आरोप भाजपने केला आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांनी केंद्रात मच्छीमारांसाठी स्वतंत्र मंत्रालय हवे, असे म्हटले होते. जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कृषी मंत्रालय आहे. तसे तुम्ही 'समुद्रातील शेतकरी' आहात. तुमच्यासाठीही स्वतंत्र मंत्रालय हवे. जेणेकरून तुमच्या समस्या थेट त्यांच्यापर्यंत पोहचतील, असे गांधी यांनी सांगितले होते. त्यावर भाजपचे केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी ट्विट करून राहुल गांधींवर टीका केली. ते म्हणाले, पंतप्रधान मोदींनी २०१९ मध्येच मत्स्य, पशुपाल आणि दुग्ध मंत्रालय स्थापन केले आहे. मंत्री म्हणून मी शपथ घेतली होती. एका पक्षाच्या नेत्याला हे माहित नाही, याचे आश्चर्य वाटते, असे गिरीराज सिंह यांनी म्हटले आहे.

Edited By Rajanand More
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख