सीरम इन्स्टिट्यूटला आग..कोरोना लस सुरक्षित - Fire at Serum Institute in Pune | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पूजा चव्हाण मृत्यप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा

सीरम इन्स्टिट्यूटला आग..कोरोना लस सुरक्षित

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 21 जानेवारी 2021

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला आग लागली

पुणे : पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला आग लागली आहे. मांजरी येथील कंपनीच्या इमारतीला बीसीजी लस ज्या ठिकाणी तयार केली जाते त्या ठिकाणी ही आग लागली आहे. कोविशिल्ड लसीचं उत्पादन केलं जात आहे, तो भाग सुरक्षित आहे. बीसीजी लस ज्या ठिकाणी तयार केली जाते त्या ठिकाणी ही आग लागली आहे. 
 
कोरोनाची लस बनवण्याचं काम होत आहे, तो विभाग सुरक्षित आहे. या जागेच्या विरुद्ध बाजूला जे गेट आहे, तिथे ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे कोव्हिशिल्ड लसीला कोणताही धोका नाही. कोरोना लसीचं काम हे गेट नंबर तीन, चार आणि पाच या परिसरात केले जाते. हा भाग अत्यंत सुरक्षित आहे.

आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आग लागली. लागलेल्या आगीचे कारण स्पष्ट झाले नसले तरी कोरोनाची लस ठेवण्यात आलेल्या बिल्डिंग कोणताही धोका नाही, असे सांगण्यात आले. 

सीरम इन्स्टिट्युटमधील "आर-बीसीजी' लस निर्मिती करणाऱ्या इमारतीमध्ये ही आग लागली आहे. कोरोनाच्या "कोवीशील्ड' लस निर्मिती केंद्र त्यापासून दूर आहे. कोरोनावरील "कोविशील्ड' या लशीची निर्मिती सीरम इन्स्टिट्युटमध्ये होत आहे.

काही दिवसांपुर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह काही देशांच्या राजदुतांनी सीरम इन्स्टिट्युटला भेट दिली होती. तर काही दिवसांपुर्वीच सीरम इन्स्टिट्युटमधून महाराष्ट्रासह देशाच्या वेगवेगळ्या भागात कोवीशील्ड ही लस पाठविण्यात आली. या सगळ्या घडामोडीमुळे सीरमकडे भारतासह संपुर्ण जगाचे लक्ष वेधले गेले होते. 

सीरम इन्स्टिट्युटमध्ये कोरोना लस निर्मिती केंद्र तसेच अन्य विविध प्रकारच्या लशींचे उत्पादन केले जाते. आग विझविण्याची अत्याधुनिक यंत्रणा असलेल्या ब्रांटो या गाडीलाही तातडीने घटनास्थळी पाठविण्यात आले. अग्निशामक दलाच्या मध्यवर्ती केंद्रासह हडपसर, कोंढवा व अन्य केंद्राच्या गाड्या व जवान आग विझविण्याच्या प्रयत्नात आहेत.

आगीच्या ठिकाणी पोलिसही तत्काळ दाखल झाले असून तेथे जमा झालेल्या गर्दीला हटविण्याचे तसेच अग्निशामक दलाच्या जवानांना सहकार्य करण्याचे काम हडपसर पोलिसांकडून केले जात आहे. आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. फायर ब्रिगेडच्या 11 गाड्या आग विझवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

दरम्यान पाच संशोधकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. आग लागलेल्या "आर-बीसीजी' लस निर्मितीच्या मारतीमध्ये लस उत्पादनाशी संबंधीत संशोधक, तंत्रज्ञ व कामगारांचा समावेश आहे. अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी काही वेळातच पाच संशोधकांना आग लागलेल्या इमारतीमधून सुखरुप बाहेर काढले. मात्र आतमध्ये आणखी काही जण असण्याची शक्‍यता अग्निशामक दलाने व्यक्त केली आहे. आतमध्ये किती संशोधक, तंत्रज्ञ, कामगार काम करत होते, याबाबतची माहिती अग्निशामक दलाला मिळालेली नाही. तरीही आत मध्ये काही व्यक्ती असण्याची शक्‍यता गृहीत धरून एकीकडे आग विझवितानाच दुसरीकडे आतमधील लोकांना सुखरुप बाहेर काढण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. 

"ब्रांटो'ची अत्यावश्‍यक मदत 
अग्निशामक दलाच्या अन्य बंब, पाण्याचे टॅंक यांच्या माध्यमातून जवानांकडून आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहेत. त्याचबरोबर अग्निशामक दलाकडे आग विझविण्यासाठी असलेल्या "ब्रांटो' या अत्याधुनिक यंत्रणायुक्त गाडीलाही घटनास्थळी आणण्यात आले आहे. "ब्रांटो ही तब्बल 70 मीटर उंच असून ती 21 व्या मजल्यापर्यंतची आग विझविण्यासाठी उपयुक्त ठरते. सध्या "ब्रांटो'चा उपयोग आग विझविण्यासाठी करण्याबरोबरच आतमध्ये अडकलेल्या नागरीकांना सुखरुप बाहेर काढण्यासाठीही केला जात आहे. या बाबत कंपनीने अद्याप अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही. एक कोटीपेक्षा जास्त कोरोनाचे लसीचे डोस देशभरात वितरीत करण्यात आले आहे.  

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख