नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी तेथील महामार्गांच्या कामासाठी तब्बल 25 हजार कोटी रुपयांची घोषणा केली. सुमारे 675 किलोमीटर लांबीची रस्तेबांधणी प्रस्तावित करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे तामिळनाडू आणि आसाममध्ये होणारी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यांनी भरीव निधीची घोषणा केली आहे.
निर्मला सीतारामन यांनी आज सकाळी अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी राष्ट्रपतींची भेट घेतली. त्यानंतर केंद्रीय मंत्रीमंडळाने अर्थसंकल्पाला मंजूरी दिली. हा अर्थसंकल्प एका अभूतपूर्व परिस्थितीनंतर मांडला जात असल्याचे सांगत सीतारामन यांनी अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात केली आहे. देशातील काही राज्यांमध्ये पुढील काही महिन्यांत विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. या राज्यांसाठी अर्थसंकल्पामध्ये भरीव तरतूद केली जाण्याची शक्यता होती. त्यानुसार अर्थमंत्र्यांकडून या राज्यांसाठी विविध घोषणा केल्या जात आहेत.
प्रामुख्याने पश्चिम बंगालची निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. राज्यातील महामार्ग व रस्त्यांच्या कामांसाठी 25 हजार कोटींची भरीव तरतूद करण्यात आली आहे. आसामध्येही 19 हजार कोटी रुपये तरतुदीची रस्त्यांची काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
कोविड लसीकरणासाठी 35 हजार कोटी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील आरोग्य सुविधांवर मोठा खर्च करण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत केली. सीतारामन यांनी काही वेळापूर्वी संसदेत अर्थसंकल्पाच्या सादरीकरणाला सुरुवात केली. कोरोनाच्या काळात होरपळलेल्या देशाला सावरण्याचे आव्हान सरकारपुढे आहे. शेती, उद्योग, बांधकाम अशा सगळ्याच क्षेत्राचे लक्ष्य अर्थसंकल्पावर आहे. दरम्यान कोविड लसीकरणासाठी ३५ हजार कोटींची तरतूद केल्याची घोषणा त्यांनी केली.
कोरोना काळात सरकारने गरजूंसाठी केलेल्या उपाययोजनांचा थोडक्यात आढावा अर्थमंत्र्यांनी घेतला. कोरोनाशी लढण्यासाठी सरकारने सर्व त्या उपाययोजना केल्या. प्रधानमंत्री गरीब अर्थसहाय्य योजनेची अंमलबजावणी सरकारने केली. आत्मनिर्भर भारतासाठी जीडीपीच्या १३ टक्के पॅकेज दिले, असे त्यांनी सांगितले.
भारताकडे सध्या कोरोनाच्या दोन लशी उपलब्ध आहेत. केवळ देशवासियांचेच नव्हे तर १०० हून अधिक देशांतील नागरिकांचे कोरोनापासून संरक्षण करण्याची क्षमता आपल्याकडे आहे. येत्या काळात आणखी दोन लशी उपलब्ध होणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. कोरोनाच्या काळात सरकारने आपले सर्व स्त्रोत अत्युच्च पातळीपर्यंत वापरले. ज्यातून गरीबातल्या गरीबांना फायदा झाला. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, आत्मनिर्भर भारतासाठी दिलेली तीन पॅकेजेस आणि अन्य घोषणा यात गुंतलेली रक्कम पाच मिनी अर्थसंकल्पाएवढी होती, असाही दावा सीतारामन यांनी केला. कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांच्या खात्यावर कोट्यवधी रुपये सरकारने जमा केल्याचेही त्यांनी सांगितले.
Edited By Rajanand More

