#Farmers Protest : तोडगा निघणार का तिढा कायम राहणार..आज बैठक - Farmers Protest national government hold seventh round talks farmer today | Politics Marathi News - Sarkarnama

#Farmers Protest : तोडगा निघणार का तिढा कायम राहणार..आज बैठक

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 4 जानेवारी 2021

आजच्या बैठकीत तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधातील आंदोलन सुरू असून आज सरकार आणि शेतकरी संघटनांची बैठक आहे. आजच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय होईल का याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. कृषी कायद्या मागे घेणे आणि एमएसपी या मुद्यावर आज चर्चा होणार आहे. आंदोलक शेतकरी आणि सरकार यांच्यातील ही सातवी बैठक आहे. आजच्या बैठकीत तोडगा न निघाल्यास आंदोलन आणखी  तीव्र करण्यात येईल, असा इशारा शेतकरी आंदोलकांनी दिला आहे.

बुधवारी केंद्राची झालेल्या सहाव्या बैठकीत दोन मुद्यांवर सहमती झाली होती. प्रस्तावित वीज अधिनियम दुरुस्ती कायद्यात बदल केले जाणार आहे. वीज वापरावर शेतकऱ्यांना मिळणारे अनुदान पूर्वीप्रमाणे कायम राहील. तसेच प्रदूषण नियंत्रणासंदर्भातील अध्यादेशातही दुरुस्ती केली जाईल, असे आश्वासन केंद्र सरकारने दिले होते. आजच्या बैठकीत तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकर्‍यांचे आंदोलन लवकरच संपेल, अशी आशा केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी व्यक्त केली आहे.

आजच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांची भेट घेऊन चर्चा केली. हे मुद्दे निकालात निघावेत यासाठी 'मधला मार्ग' शोधून सर्व संभाव्य पर्यायांवर चर्चा केल्याचे नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटले आहे. या बैठकीत जो निर्णय होईल, तो देशाच्या आणि शेतकऱ्यांच्या हिताचा असेल, असेही नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटले आहे.

दिल्लीच्या सीमेवर कडाक्‍याच्या थंडीतही गेला महिनाभर धरणे आंदोलन सुरू आहे. गेल्या 40 दिवसांपासून शेतकरी संघटना दिल्लीच्या वेशीवर ठाण मांडून बसल्या आहेत. कृषी कायद्यांविरोधात आतापर्यंत केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये सहावेळा चर्चा झाली. मात्र, या सर्व बैठका निष्फळ ठरल्या आहेत. 

शेतकऱ्यांच्या हिताविषयी बोलणे हा खरा राष्ट्रवाद..पायलटांचा टोला
जयपूर : काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी कृषी कायद्यांवरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि केंद्र सरकारवर निशाना साधला आहे. काल ते जयपूर येथे बोलत होते. सचिन पायलट म्हणाले की तुम्ही लव्ह जिहादसाठी कायदे बनवत आहात. तुम्हाला लग्नासारख्या गोष्टींवर चर्चा करायला वेळ आहे. मात्र, तुमच्याकडे शेतकऱ्यांसाठी वेळ नाही. हा म्हणजे शेतकऱ्यांचे भवितव्य अंधारात लोटण्याचा प्रकार आहे. हाफ चड्डी घालून खोटी भाषणं देण्याला राष्ट्रवाद म्हणत नाहीत. तर शेतकऱ्यांच्या हिताविषयी बोलणे हा खरा राष्ट्रवाद आहे.
Edited  by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख