'तारीख पर तारीख...' म्हणत शेतकऱ्याने संपवलं जीवन...

कृषी कायद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला दोन महिने उलटून गेले. तरीही त्यावर अदयाप तोडगा निघू शकलेला नाही.
 Farmer From Haryana Dies By Suicide Near Tikri Border
Farmer From Haryana Dies By Suicide Near Tikri Border

नवी दिल्ली : कृषी कायद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला दोन महिने उलटून गेले. तरीही त्यावर अदयाप तोडगा निघू शकलेला नाही. त्यामुळे आंदोलनातील शेतकऱ्यांमध्ये सरकारविरोधी रोष वाढू लागला आहे. याच रोषातून रविवारी सकाळी एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. 

आत्महत्या करण्यापूर्वी शेतकऱ्याने  चिठ्ठी लिहून ठेवली असून त्यात केंद्र सरकारला दोष देण्यात आला आहे. ''सरकार तारीख पर तारीख दे रही है..." असे चिठ्ठीमध्ये लिहिले आहे. करमवीर सिंग असे या 52 वर्षीय शेतकऱ्याचे नाव आहे. टिकरी सीमेपासून दोन किलोमीटर अंतरावर एका झाडाला गळफास घेतल्याची इतर आंदोलकांच्या निदर्शकांच्या लक्षात आले. त्यानंतर लगेचच पोलिसांना कळविण्यात आले. 

पोलिसांनी केलेल्या पाहणीत या शेतकऱ्याने लिहिलेली चिठ्ठी आढळून आली. त्यामध्ये लिहिले आहे की, ''भारतीय किसान युनियन झिंदाबाद. सरकार तारीख पर तारीख देती जा रही है. इसका कोई अंदाजा नही है की काले कानून कब रद्द होगा.'' करमवीर सिंग हे झिंद मधील सिंघवाल गावातील रहिवाशी आहेत. त्यांनी तीन मुली आहेत. 

दरम्यान, कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांने आत्महत्या करण्याची ही पहिली घटना नाही. टिकरी सीमेवर मागील महिन्यातही रोहतक येथील 42 वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. तर डिसेंबर महिन्यात पंजाबमधील जलालबाद येथील एका वकीलाने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटनाही घडली आहे. 

सिंघू सीमेवर काही दिवसांपूर्वी संत राम सिंग यांनीही आपले आयुष्य संपविले आहे. शेतकऱ्यांचे दु:ख पाहू शकत नसल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला. नोव्हेंवर 2020 पासून लाखो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. प्रामुख्याने पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी हे आंदोलन सुरू आहे. 

चर्चा ठरल्या विफल

केंद्र सरकार व शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींच्या आतापर्यंत अनेक बैठका झाल्या आहेत. पण शेतकरी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर ठाम असल्याने त्यातून काहीच निष्पन्न झालेले नाही. हे कायदे शेतकरी हिताचेच असल्याचे केंद्र सरकारकडून ठामपणे सांगितले जात आहे. तर कायदे रद्द केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे. त्यामुळे आंदोलनाचा हा तिढा वाढतच चालला आहे. 

दिल्लीत झाला होता हिंसाचार

कृषी कायद्यांविरोधात शेतकरी संघटनांनी दिल्लीत काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला. लाल किल्ल्यावर शेतकरी संघटना व धार्मिक ध्वज फडकविण्यात आला. पोलिसांना मारहाणीचे प्रकारही घडले. तर पोलिसांनीही लाठीमार केला. आंदोलकांना पांगविण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. या घटनेनंतर दिल्लीच्या सर्व सीमांवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Edited By Rajanand More
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com