नवी दिल्ली : कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ पॉप स्टार रिहानाने ट्विट केलं आहे. यावरुन मोठा गदारोळ सुरू झाला आहे. आता नवीन माहिती उघडकीस येत आहे. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी, टि्वट करण्यासाठी रिहानाला २.५ मिलियन डॉलर (१८ कोटी रुपये) दिले असल्याची माहिती समोर येत आहे.
यामुळे या आंदोलनामागे कुणाचा हात आहे, याबाबत अनेक तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. रिहानाला १८ कोटी देण्यामागे कॅनडातील पोएटिक जस्टीस फाऊंडेशनचा हात असल्याची चर्चा आहे.
रिहानाच्या विरोधात क्रिकेटचा देव समजला जाणारा सचिन तेंडुलकर मैदानात उतरला होता. सचिननं या प्रकरणी केलेल्या ट्विटनंतर त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे. याचवेळी जगप्रसिद्ध टेनिसस्टार मारिया शारापोवा हिची माफी मागण्याचे सत्र भारतीयांकडून सोशल मीडियावर सुरू झाल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
नापास विद्यार्थी सरकार चालवित आहे...फडणवीसांचा टोला https://t.co/cHRBVjb1Ns
— Sarkarnama (@SarkarnamaNews) February 6, 2021
कृषी कायद्यांविरोधात दोन महिन्यांहून अधिक काळ शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. एकीकडे शेतकरी मागे हटण्यास तयार नाहीत, तर दुसऱ्या बाजूला सरकारही आपल्या भूमिकेवर ठाम आहे. दिल्लीत ट्रॅक्टर मोर्चादरम्यान झालेल्या मोठ्या हिंसाचारानंतर केंद्र सरकारने राजधानी दिल्लीच्या सीमेवरील सुरक्षा आणखी कडक केली आहे. या आंदोलनाला अनेक बॉलिवूड कलाकारांनी पाठिंबा दर्शविला आहे. हॉलिवूडची पॉप स्टार रिहाना हिनेही शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात एक ट्विट केलं होतं. तिने शेतकरी आंदोनाच समर्थन केलं होतं.
याला उत्तर म्हणून सचिन तेंडुलकरने ट्विट केलं होतं. त्यानं म्हटलं होतं की, भारताच्या सार्वभौमत्वाशी कोणतीही तडजोड कदापी होणार नाही. बाह्य शक्तींनी केवळ प्रेक्षक बनावे यातील भागीदार बनू नये. भारतीयांना भारत माहिती आहे आणि ते भारताबाबतचा निर्णय घेऊ शकतात. एक देश म्हणून आपण एकत्र राहूयात.
शारापोवाने 2015 मध्ये एका मुलाखतीत सचिन तेंडुलकर कोण हे माहिती नसल्याचे म्हटलं होतं. यावरुन तिला भारतीयांनी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं होतं. आता सचिननं शेतकरी आंदोलनाच्या बाबतीत ट्विट केल्यानं भारयीय नेटिझन्स भडकले आहेत. त्यांनी सुमारे पाच वर्षांपूर्वी ट्रोल केल्याबद्दल शारापोवाची माफी सोशल मीडियावर माफी मागण्यास सुरवात केली आहे.
यात केरळमधील नेटिझन्स आघाडीवर आहेत. त्यांनी दिला केरळला भेट देण्याच निमंत्रणही दिलं आहे. कोरोना संकट संपल्यानंतर त्रिचीला भेट द्यावी, असे अनेक जणांनी म्हटले आहे. एका सोशल मीडिया यूजरने म्हटलं आहे की, शारापोवा तू सचिनबाबत बरोबर होतीस. त्याच्याबद्दल माहिती असावा असा तो माणूस नाही.
या सर्व प्रकाराने शारापोवाही आश्चर्यचकित झाली आहे. तिच्या फेसबुक आणि ट्विटरवर कमेंटचा पाऊस पडत आहे. तिने ट्विटरवर म्हटले आहे की, आणखी कुणाचा यामुळे गोंधळ उडाला आहे का?

