'गोली मारो' म्हणणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक करणारा आयपीएस अधिकारी राजकारणात... - Ex IPS Officer Who Ordered Arrest Of BJP Men Over Slogans Joins Trinamool | Politics Marathi News - Sarkarnama

'गोली मारो' म्हणणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक करणारा आयपीएस अधिकारी राजकारणात...

वृत्तसंस्था
मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021

भाजपच्या रॅलीदरम्यान 'गोली मारो'चे नारे देणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक केलेल्या पोलिस अधिकाऱ्याने काही दिवसांपूर्वी तडकाफडकी राजीनामा दिला होता.

कोलकता : भाजपच्या रॅलीदरम्यान 'गोली मारो'चे नारे देणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक केलेल्या आयपीएस अधिकाऱ्याने काही दिवसांपूर्वी तडकाफडकी राजीनामा दिला होता. वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिल्याचे त्यांनी सांगितले होते. पण सगळ्यांचे अंदाज चुकवत त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच दोन्ही पक्षांकडून सभांसह विविध माध्यमातून शक्तीप्रदर्शन केले जात आहे. तृणमुलला सोडचिठ्ठी दिलेले सुवेंदु अधिकारी यांनी 21 जानेवारी रोजी एका रॅलीचे आयोजन केले होते.

या रॅलीदरम्यान काही कार्यकर्त्यांनी 'गोली मारो' अशी घोषणाबाजी केली. त्यांना हुमायूं कबीर या पोलिस अधिकाऱ्याने अटक केली होती. ते कोलकता जवळील चंदननगरचे पोलिस आयुक्त होते. डिसेंबर महिन्यातच त्यांची बढती झाली होती. 

या घटनेनंतर कबीर यांनी काही दिवसांतच राजीनामा दिला. कौटूंबिक कारणास्तव राजीमाना दिल्याचे त्यांनी सांगितले होते. पण काही दिवसांतच त्यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला. कबीर यांच्या पत्नी अनिंदिता कबीर या आधीपासून तृणमूलसोबत आहेत. त्यामुळे ते राजकारणात येतील, अशी शक्यता आधीपासूनच व्यक्त केली जात होती.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या एका सभेत त्यांनी आज तृणमूलमध्ये अधिकृतपणे प्रवेश केला. यावेळी बोलताना कबीर म्हणाले, ममता बॅनर्जी यांनी बंगालचा विकास केला आहे. मी त्यांच्यासोबत काम केल्याने त्यांना लोकांविषयी किती जिव्हाळा आहे, हे माहित आहे. त्यांच्यापासूनच मला प्रेरणा मिळाली. बाहेरील एक पक्ष इथे दुफळी निर्माण करून विजयाचा प्रयत्न करत आहे. बंगालचे लोकच त्यांना उत्तर देतील. ममता बॅनर्जी पुन्हा सत्तेत येतील, असा विश्वास कबीर यांनी व्यक्त केला. 

कबीर हे आगामी विधानसभा निवडणूक लढविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ते हुगळी जिल्ह्यातून तृणमूलचे उमेदवार असू शकतात. पण अंतिम निर्णय ममता बॅनर्जी यांचा असेल, असे सुत्रांनी सांगितले. 

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये तृणमूलला सातत्याने धक्के बसत आहेत. पक्षाचे आमदार राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश करत असल्याने ममता बॅनर्जींची डोकेदुखी वाढत चालली आहे. दोन्ही पक्षांकडून आरोप-प्रत्यारोपाची एकही संधी सोडली जात नाही. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान काही जणांनी जय श्रीराम असे नारे दिले होते. त्यावरून ममतादीदी चांगल्या भडकल्या होत्या. कार्यक्रमाला बोलवून अपमान केल्याची भावना व्यक्त करून त्यांनी भाषण थांबविले होते. त्यावरूनही बरेच राजकारण झाले. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख