Election on this date for 2 Rajya Sabha seats | Sarkarnama

राज्यसभेच्या 2 जागांसाठी या तारखेला निवडणूक 

वृत्तसंस्था
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

खासदार बेनीप्रसाद वर्मा व एम. पी. वीरेंद्रकुमार यांच्या निधनामुळे अनुक्रमे उत्तर प्रदेश व केरळमधील राज्यसभेच्या या 2 जागा रिक्त झाल्या होत्या.

नवी दिल्ली :  राज्यसभेच्या (काऊन्सिल ऑफ स्टेटस्‌) 2 रिक्त जागांसाठी 24 ऑगस्टला निवडणुका घेण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार या तिन्ही पोटनिवडणुकांसाठी 6 ऑगस्टला अर्ज भरण्यास सुरवात होईल. 13 ऑगस्टला अर्ज भरण्याची अखेरची तर 17 ऑगस्ट ही अर्जमाघारीची मुदत आहे. 

24 ऑगस्टला (सोनवारी) सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत निवडणूक व त्याच दिवशी सायंकाळी 5 पर्यंत मतमोजणी व निकालांची घोषणा करण्यात येईल. निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम 26 ऑगस्टपर्यंत पूर्ण करावयाचा आहे.खासदार बेनीप्रसाद वर्मा व एम. पी. वीरेंद्रकुमार यांच्या निधनामुळे अनुक्रमे उत्तर प्रदेश व केरळमधील राज्यसभेच्या या 2 जागा रिक्त झाल्या होत्या. याशिवाय एम. व्ही. रमणा राव यांच्या राजीनाम्यामुळे आंध्र प्रदेश विधान परिषदेतील रिक्त झालेल्या जागेसाठीही 24 तारखेलाच पोटनिवडणूक घेण्याचे आयोगाने जाहीर केले. 

वर्मा (समाजवादी पक्ष) व वीरेंद्रकुमार (डावी लोकशाही आघाडी) यांची मुदत जुलै व एप्रिल 2022 मध्ये संपत होती. मात्र या वर्षी दोघांचेही निधन झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या दोन्ही जागांवर पोटनिवडणुका होणार आहेत. वर्मा यांच्या रिक्त जागेवरून उत्तर प्रदेशातील एक जागा वाढण्याची आशा भाजपला आहे. रमणा राव यांची आमदारकीची मुदत मार्च 2023 मध्ये संपत होती, मात्र त्यांनी नुकताच राजीनामा दिला. 

हेही वाचा : राम मंदिरासाठी रथयात्रा काढणाऱ्या अडवानींनाच भूमिपूजनातून डावलले
 
नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम सुरू करण्याचा मुहूर्त अखेर ठरला आहे. मंदिराच्या पायाभरणी कार्यक्रमाचे निमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात आले असून, ५ ऑगस्टला हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण देशभरात रथयात्रा काढून राम मंदिराविषयी जनमत निर्माण करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांना पाठविण्यात आलेले नाही. याचबरोबर भाजपचे आणखी एक ज्येष्ठ नेते मुरलीमनोहर जोशी यांनाही निमंत्रण पाठविण्यात आलेले नाही.  या दोन ज्येष्ठ नेत्यांना डावलण्यात आल्याने नाराजी व्यक्त होत आहे. 

रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार, राम मंदिराच्या भूमिपूजनाचे दूरदर्शनवर थेट प्रक्षेपण होणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सोशल डिस्टन्सिंगचे बंधन सर्वांनाच पाळावे लागेल. यामुळे कार्यक्रमाला दोनशेपर्यंत व्यक्ती सहभागी होतील. कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या व्यक्तींची यादी अद्याप अंतिम झालेली नाही. या कार्यक्रमाचे निमंत्रण उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह आणि मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांना मिळाले आहे. त्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याचे म्हटले आहे. याचवेळी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी आणि मुरलीमनोहर जोशी यांना मात्र, निमंत्रण पाठविण्यात आलेले नाही. अडवानी, जोशी आणि उमा भारती हे सर्वजण बाबरी मशिद पाडल्याप्रकरणी सुरू असलेल्या खटल्यात आरोपी आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख