स्टार प्रचारकांची संख्या 25 टक्क्यांनी कमी करण्याचा आदेश : गुलाबराव पाटलांचे काय होणार? - election commission orders to curtail numbers of star campaigner | Politics Marathi News - Sarkarnama

स्टार प्रचारकांची संख्या 25 टक्क्यांनी कमी करण्याचा आदेश : गुलाबराव पाटलांचे काय होणार?

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 15 ऑक्टोबर 2020

शिवसेनेने राज्यातील अनेक नेत्यांची बिहारच्या प्रचारासाठी स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती केली आहे. 

नवी दिल्ली : बिहार विधानसभेची निवडणूक कोविड-१९ काळात होत असल्याने त्यासाठीच्या स्टार प्रचारकांच्या संख्येवर निवडणूक आयोगाने निर्बंध आणले आहेत. या संख्येत मोठ्या प्रमाणात घट करण्याचा आदेश आयोगाने दिला आहे.

स्टार प्रचारकांच्या यादीवरून भाजपमध्ये आधीच धुसफूस असताना संख्या कमी करण्याची वेळ आली आहे. या नवीन मार्गदर्शक तत्त्वानुसार आता मान्यताप्राप्त राष्ट्रीय / राज्यस्तरीय राजकीय पक्षाला स्टार प्रचारकांची संख्या ४० ऐवजी ३० ठेवावी लागेल. तसेच मान्यताप्राप्त असलेल्या नोंदणीकृत राजकीय पक्षांसाठी स्टार प्रचारकांची संख्या कोविड-१९ च्या काळात वीस ऐवजी १५ असेल. त्याचप्रमाणे स्टार प्रचारकांची यादी सादर करण्याचा कालावधी अधिसूचना जारी केल्यानंतर सात दिवसांऐवजी दहा दिवसांपर्यंत वाढविण्यात आला आहे.

ज्या राजकीय पक्षांनी स्टार प्रचारकांची यादी सादर केलेली आहे, त्यांना सुधारित यादी दिलेल्या कालावधीत पुन्हा सादर करावी लागेल. स्टार प्रचारकांच्या सभेसंबंधी परवानगी घेण्यासाठी प्रचाराच्या ४८ तास अगोदर जिल्हा निवडणूक प्रशासनाकडे याची माहिती द्यावी लागेल जेणेकरून सर्व सुरक्षा उपाय वेळेच्या आत करणे शक्य होईल. ही सर्व सुधारित मार्गदर्शक तत्त्वे तात्काळ प्रभावाने अंमलात येतील, असे आयोगाने म्हटले आहे.

भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत माजी केंद्रीय मंत्री शहनवाज हुसेन आणि राजीवप्रताप रुडी यांचा समावेश नव्हता. रुडी यांनी यावरून थयथयाट केला होता. मला पक्ष आमदार होण्याच्याही लायकीचा समजत नसल्याची खंत त्यांनी समाजमाध्यमांवर दिली. त्यावर भाजपने अधिकृत प्रतिक्रिया देत ही यादी अंतिम नसल्याचे सांगितले होते. प्रत्यक्षात आता आहे तीच संख्या कमी करण्याचे निर्बंध आल्याने पक्ष या दोघांना कसे सामावून घेणार, हा प्रश्नच आहे. राष्ट्रवादी काॅग्रेस पक्ष हा राष्ट्रीय पक्ष असल्याने त्यांनीही तब्बल 40 प्रचारकांची यादी जाहीर केली होती. त्यात आता दहा नावे कमी करावी लागतील. दुसरीकडे शिवसेनेने राज्य पक्ष म्हणून बिहारसाठी वीसजणांची स्टार प्रचारक म्हणून निवड केली होती. त्यातील पाच नावे कमी करावी लागणार आहेत. आता हे पक्ष कोणाच्या नावावर काट मारणार, याची उत्सुकता राहील. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह कृपाल तुमाने यांच्यासह सुभाष देसाई, संजय राऊत, चंद्रकांत खैरे, अनिल देसाई, विनायक राऊत, अरविंद सावंत, गुलाबराव पाटील, राजकुमार बाफना, प्रियांका चतुर्वेदी, राहुल शेवाळे, सुनील चिटणीस, योगराज शर्मा, कौशलेंद्र शर्मा, विनय शुक्ला, गुलाबचंद दुबे, अखिलेश तिवारी, अशोक तिवारी यांचा समावेश करण्यात आला आहे. यातील पाच नावांवर काट मारावी लागणार आहे. 

२१ ऑगस्ट २०२० रोजी आयोगाने निवडणुका आयोजित करण्याच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. या अंतर्गत निवडणुकांच्या काळात कशाप्रकारे मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करावी  याबद्दल निर्देश आहेत. यासाठी राजकीय पक्ष, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याशी वार्तालाप करून मार्गदर्शक तत्त्वे घोषित करण्यात आले आहे. यासंबंधी माहिती https:flect.gov_inifitesifile/12167-broad-guidelines-for­conduct-of-generat-electionbve-election-during-covid-19/या संकेतस्थळावरही उपलब्ध केली आहे.

निवडणूक आयोगाने बिहार भेटीत सार्वत्रिक निवडणुकांच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. यासाठी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय पक्ष राज्याचे मुख्य सचिव, वरिष्ठ अधिकारी, अतिरिक्त मुख्य सचिव, (गृह), मुख्य निवडणूक अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी, पोलीस अधीक्षक इत्यादींशी विस्तृत चर्चा केली. यावेळी कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर दिलेल्या सर्व सुरक्षा नियमांचे पालन केले जात असल्याचे आयोगाला सूचित करण्यात आले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख