मोदींना निवडणूक आयोगाचा झटका; ते फोटो हटवण्याचा आदेश  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असणारे होर्डिंग ७२ तासांत हटवा असा आदेश निवडणूक आयोगाने दिला आहे.
 Narendra Modi .jpg
Narendra Modi .jpg

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असणारे होर्डिंग ७२ तासांत हटवा असा आदेश निवडणूक आयोगाने दिला आहे. पेट्रोल पंपावर केंद्र सरकारच्या योजनांची जाहिरात करणाऱ्या होर्डिंगवर पंतप्रधानांचा फोटो असणे आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. निवडणूक आयोगाने शुक्रवारी पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पद्दुचेरी या पाच राज्यांच्या निवडणूक तारखांची घोषणा केली. त्यानंतर या राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे.

या जाहिराती विरोधात तृणमूल काँग्रेसने केलेल्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाकडून हा आदेश दिला आहे. तृणमूल काँग्रेसने कोरोना लसीकरण मोहिमेच्या पोस्टर आणि व्हिडीओंमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोचा वापर करण्यावरुन आक्षेप नोंदवला होता. निवडणूक आयोगाने पेट्रोल पंपांसोबतच कोरोना लसीकरण मोहिमेच्या प्रचारात वापरण्यात आलेला मोदींचा फोटोही ७२ तासांत हटवण्यास सांगितले आहे.

दरम्यान, भाजपानेही तृणमूल काँग्रेसविरोधात निवडणूक आयोगाकडे धाव घेत आचारसंहिता लागू झालेली असतानाही पश्चिम बंगालमधील दोन मंत्री मतदारांना आकर्षित करण्यासाठी आश्वासन देत असल्याचा आरोप केला होता. भाजपाने दोन्ही मंत्र्यांना विधानसभा निवडणूक लढण्यापासून रोखण्यात यावे अशी मागणी केली आहे. तृणमूल काँग्रेसने हे आरोप फेटाळून लावले आहेत. 

कोरोना लस घेतल्यानंतर लाभार्थींना लसीकरणाचे प्रमाणपत्र दिले जात आहे. या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो छापण्यात आला आहे. प्रमाणपत्रावरील हा फोटो काढण्यासाठी विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाकडे जाण्याचा निर्णय घेतला होता.

प्रमाणपत्रावर लस घेणाऱ्याची प्राथमिक माहिती, लस घेतल्याची तारीख, ठिकाण तसेच लस देणाऱ्याची माहिती आहे. त्याखाली हिंदी व इंग्रजीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश व त्यासोबत त्यांचा फोटो आहे.  मोदी यांच्या या फोटावरून पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. त्यावरुन निवडणूक आयोगाने हा आदेश दिला आहे.

 Edited By - Amol Jaybhaye  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com