Rajya Sabha.jpg
Rajya Sabha.jpg

राज्यसभेचा प्रत्येक खासदार सरासरी 63 कोटींचा धनी...

निम्म्याहून अधिक सदस्यांनी त्यांच्याविरुध्द गुन्हेगारी स्वरुपाची प्रकरणे असल्याचे त्यांच्या वैयक्तिक माहिती देणाऱ्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

नवी दिल्ली : सध्याच्या राज्यसभेतील 24 टक्के सदस्यांनी त्यांच्याविरुध्दच्या गुन्हेगारी प्रकरणांची माहिती जाहीर केलेली असून या सदस्यांच्या संपत्ती व मालमत्तेची सरासरी काढली असता एक सदस्य 62.67 कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक असल्याची माहिती समोर आली आहे.  "असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स' (एडीआर) या संस्थेने केलेल्या अभ्यासात ही माहिती उजेडात आली आहे.

सध्या राज्यसभेची सदस्यसंख्या 230 असून या संस्थेने 229 सदस्यांच्या माहितीचे विश्‍लेषण केले आहे. या सदस्यांपैकी 54 टक्के म्हणजे निम्म्याहून अधिक सदस्यांनी त्यांच्याविरुध्द गुन्हेगारी स्वरुपाची प्रकरणे असल्याचे त्यांच्या वैयक्तिक माहिती देणाऱ्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. यापैकी बारा टक्के म्हणजे 28 सदस्यांनी त्यांच्याविरुध्द गंभीर अशी गुन्हेगारी किंवा फौजदीरी स्वरुपाची प्रकरणे असल्याचे सांगितले आहे. महाराष्ट्रातून भाजपतर्फे राज्यसभेवर निवडून आलेले उदयनराजे भोसले यांनी त्यांच्याविरुध्द भारतीय दंडविधानाच्या कलम 302 खाली असलेल्या खुनाच्या प्रकरणाचा उल्लेख केलेला आहे.

खून किंवा हत्येचा प्रयत्न (भादवि 307) करण्याचे प्रकरण असलेले चार सदस्य आहेत. महिलांविरुध्दच्या गुन्ह्यांच्या प्रकरणाचाही यात समावेश असून चार सदस्यांनी तशी माहिती सादर केलेली आहे. कॉंग्रेसचे सरचिटणीस आणि आताच राजस्थानातून राज्यसभेवर निवडून आलेले आणि राहूल गांधी यांचे निकटवर्ति के.सी.वेणुगोपाल यांनी त्यांच्याविरुध्द असलेल्या बलात्काराच्या तक्रारीचा(भादवि376) उल्लेख केला आहे. ते मूळचे केरळचे आहेत पण त्यांना राजस्थानातून राज्यसभेवर निवडून आणलेले आहे.


भाजप प्रथम, काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर 

ही अपराधी प्रकरणे असलेल्या सदस्यांची पक्षनिहाय वर्गवारी केल्यास सत्तापक्ष असलेला भाजप प्रथम क्रमांकावर आहे. 77 सदस्यसंख्या असलेल्या भाजपमधील 14 सदस्य(18 टक्के) फौजदारी प्रकरणे असलेले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर कॉंग्रेस पक्ष आहे. कॉंग्रेसच्या 40 पैकी 8 सदस्य अपराधी प्रकरणात गुंतलेले आहेत. इतर पक्षांमध्ये तृणमूल कॉंग्रेस -2, बिजु जनता दल - 3, वायएसआर कॉंग्रेस -3, समाजवादी पक्ष - 2. यात गंभीर गुन्ह्यांच्या प्रकरणात गुंतलेल्यांची आकडेवारी पाहता कॉंग्रेसचा प्रथम क्रमांक असून त्यांच्या 40 पैकी आठ सदस्यांच्याविरुध्द गंभीर गुन्ह्यांच्या प्रकरणांची नोंद आहे. भाजप - 5, वायएसआर कॉंग्रेस व राष्ट्रीय जनता दल प्रत्येकी 3 आणि तृणमूल कॉंग्रेस व बिजु जनता दल प्रत्येकी 1 अशी इतर पक्षांची आकडेवारी आहे. याची राज्यवार वर्गवारी केल्यास महाराष्ट्रातील एकंदर 19 सदस्यांपैकी 8, बिहारमधील 15 पैकी 8 सदस्यांविरुध्द फौजदारी प्रकरणे आहेत. ही दोन राज्ये अग्रक्रमी आहेत. त्या खालोखाल उत्तर प्रदेशातील 30 पैकी 6 सदस्यांविरुध्द गुन्ह्यांची प्रकरणे आहेत. तमीळनाडूतील चार व पश्‍चिम बंगालमधील दोन सदस्यांचा या श्रेणीत समावेश आहे.

संपत्तीच्या संदर्भातही राज्यसभेतील एक-तृतीयांशापेक्षा अधिक सदस्य हे दहा कोटी रुपये किंवा त्याहून अधिक संपत्तीचे मालक असल्याचे आढळून येते. राज्यसभेतील 37 टक्के म्हणजे 86 सदस्य या अशा धनवानांच्या यादीत आहेत. पाच ते दहा कोटि रुपये संपत्तीच्या श्रेणीत 36 सदस्य आहेत र 1 कोटी ते 5 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे स्वामी असलेल्यांची संख्या 81 आहे. वीस लाख ते 1 कोटी रुपयांच्या संपत्तीवानांमध्ये22 सदस्यांचा समावेश होतो.

परिमल नाथवानी, ए.ए.रामी रेड्डी व जया बच्चन कर्जबाजारी

सर्वात गरीब म्हणजे 20 लाख रुपयांपेक्षा कमी संपत्ती असलेल्या सदस्यांची संख्या केवळ "चार' आहे. 233 पैकी 203 सदस्य "करोडपति' आहेत. यामध्ये प्रथम क्रमांकावर भाजप( 77 पैकी69), कॉंग्रेस (40 पैकी 37), अण्णाद्रमुक (9 पैकी 9), तृणमूल कॉंग्रेस (13 पैकी 9). सर्वाधिक पहिल्या तीन श्रीमंत सदस्यांमध्ये महेंद्र प्रसाद(संयुक्त जनता दल), ÷ए.ए.रामी रेड्डी(वायएसआर कॉंग्रेस), जया बच्चन(समाजवादी पार्टी) यांचा समावेश होतो. सर्वात कमी धनवान तीन सदस्यांमध्ये महाराजा सानाजोबा लिशेंबा(मणिपूर - भाजप), संजयसिंग (दिल्ली -आप) आणि समीर ओरांउ(झारखंड -भाजप) यांचा समावेश होतो. सर्वाधिक कर्जबाजारी सदस्यांमध्ये परिमल नाथवानी, ए.ए.रामी रेड्डी व जया बच्चन यांचा समावेश होतो.
Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com