आसाममधील पुढील मिशन; घराघरात पिण्याचे पाणी... - 'Doosri baar, BJP sarkar' in Assam, says PM Modi | Politics Marathi News - Sarkarnama

आसाममधील पुढील मिशन; घराघरात पिण्याचे पाणी...

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 21 मार्च 2021

आसाममध्ये सलग दुसऱ्यांदा भाजपचेच सरकार येईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी व्यक्त केला. काँग्रेस सरकारच्या काळात आसाममध्ये बिकट परिस्थिती होती. काँग्रेसच्या कचाट्यातून आसाम सहीसलामत बाहेर आला नसता तर काँग्रेसने आसाम नक्कीच लुटले असते, अशी बोचरी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केली. 

आसाम:  डबल इंजिनचे भाजप सरकार आसाममध्ये पुन्हा धमाल करेल. भाजपने आतापर्यंत स्वच्छतागृह, एलपीजी गॅस, वीज व मोफत वैद्यकीय सुविधा उत्तम प्रकारे उपलब्ध करून दिल्या आहेत. आता आम्ही आसाममध्ये घराघरात पाणी पोहोचवण्यासाठी कटिबद्ध असून त्या दृष्टीने पूर्ण शक्तीने काम करू, अशी स्पष्टोक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. आसाममधील बोकाखात येथे रॅलीला संबोधित करताना नरेंद्र मोदी यांनी हा विश्वास व्यक्त केला. 

विधानसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापू लागले आहे. विविध राजकीय पक्षांकडून घोषणांची व आश्वासनांची खैरात वाटली जात आहे. भाजप पक्ष देखील यात तसूभरही मागे नाही. आसाममध्ये सलग दुसऱ्यांदा भाजपचेच सरकार येईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी व्यक्त केला. काँग्रेसवर टीका करताना मोदी म्हणाले, काँग्रेस सरकारच्या काळात आसाममध्ये बिकट परिस्थिती होती. काँग्रेसच्या कचाट्यातून आसाम सहीसलामत बाहेर आला नसता तर काँग्रेसने आसाम नक्कीच लुटले असते. मात्र भाजपच्या कारकिर्दीत आसामने चांगली प्रगती केली असून पुढेही या राज्याला खूप उंचीवर घेऊन जाण्यास आम्ही कटिबद्ध असल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले. 

आसाममधील आधीच्या काँग्रेस सरकारवर ताशेरे ओढत मोदी म्हणाले, काँग्रेस सत्तेवर असताना ब्रह्मपुत्रा नदीची दोन टोके कशी जोडायची? हा त्यांच्यासमोर प्रश्न होता. भाजप आसाममध्ये सत्तेवर आल्यानंतर मात्र ब्रह्मपुत्रावर अनेक पूल बांधले गेले असून ज्या पुलांचे काम रखडले होते, त्यांचे काम पूर्ण देखील केले आहे. जंगलातील प्राण्यांच्या सुरक्षिततेला भाजप सरकार प्राधान्य देत आहे. जंगलांचे संवर्धनही चांगल्या प्रकारे करत असल्याचे मोदी यांनी नमूद केले.  

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख