गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनंतर आता या मुख्यमंत्र्यांवर संक्रांत? असंतुष्ट भाजप नेत्यांना यश 

नाराजीची ही धग दिल्लीपर्यंत पोहोचविण्यात असंतुष्ट भाजप नेत्यांना यश आले आहे.
गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनंतर आता या मुख्यमंत्र्यांवर संक्रांत? असंतुष्ट भाजप नेत्यांना यश 
02Jairam_thakur.jpg_ff.jpg

नवी दिल्ली :  गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरुन विजय रूपाणी यांना हटविण्यात आल्यानंतर आता भाजपने हिमाचल प्रदेशाचे  (Himachal Pradesh) मु्ख्यमंत्री जयराम ठाकूर (Jairam Thakur) यांना तातडीने  बोलावून घेतले आहे.  हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्याविरूद्ध प्रदेश भाजपमध्ये नाराजी तीव्र आहे. राज्यात भाजपने नुकतीच जी आशीर्वाद यात्रा काढली त्यापासून मुख्यमंत्र्यांना दूर ठेवण्यात आल्याची माहिती मिळते. नाराजीची ही धग दिल्लीपर्यंत पोहोचविण्यात असंतुष्ट भाजप नेत्यांना यश आले आहे.

मुख्यमंत्री ठाकूर यांच्यासह राज्य प्रभारी अविनाश राय खन्ना, संजय टंडन, संघटन मंत्री पवन राणा व भाजप प्रदेशाध्यक्ष सुरेश कश्यप यांनाही दिल्लीत बोलावून घेण्यात आले आहे. 
भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा या सर्वांबरोबर चर्चा करणार आहेत. त्यानंतर ठाकूर यांच्या मुख्यमंत्रिपदाचा निर्णय अमित शहा यांच्या दरबारी घेतला जाऊ शकतो. हा काळ जास्तीत जास्त २-३ दिवसांचा असेल असे भाजप सूत्रांनी सांगितले.

भाजपच्या सर्वेसर्वा नेतृत्वाने हिमाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांना तातडीने दिल्लीत बोलावून घेतले आहे. गुजरातमध्ये मुख्यमंत्री बदलल्यानंतर आता भाजप पक्षश्रेष्ठी हिमाचलमध्ये नेतृत्वबदल करू शकते, अशी माहिती मिळत आहे. त्यापाठोपाठ गोवा व त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांनाही ‘नंबर’ लागू शकतो अशीही चर्चा आहे.

आपल्या धाकट्या भावाला या राज्यात वरचे पद मिळविण्यासाठी आसुसलेल्या एका केंद्रीय मंत्र्यांनी ठाकूर यांच्या विरुद्धच्या नाराजीच्या आगीत तेल ओतल्याचीही माहिती आहे.
ठाकूर गेल्या रविवारी दिल्लीत होते. ते सिमला येथे परतल्यावर दोन दिवसांतच त्यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना पुन्हा दिल्लीत बोलावून घेणे हे ठाकूर यांच्या ‘खुर्ची’साठी गंभीर लक्षण मानले जाते. 
 
मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांचे पद जाणारच, असा प्रचार काँग्रेसने हिमाचल प्रदेशात सुरू केला आहे. यापूर्वी उत्तराखंड, कर्नाटक या राज्यांचे जे मुख्यमंत्री भाजपच्या सर्वेसर्वा नेतृत्वाने हटविले त्यांच्याबरोबरच्या दिल्लीत अशाच प्रकारच्या बैठकी झाल्या होत्या. त्यावेळीही संघटनात्मक चर्चेसाठी ते दिल्लीत आल्याचे सांगितले गेले. प्रत्यक्षात त्या मुख्यमंत्र्यांना तातडीने नारळ मिळाला आहे.

गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांनी शपथ घेतल्यानंतर कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी गुजरातच्या मुख्यमंत्री बदलाबाबत भाजपवर नुकतीच खोचक टीका केली आहे. पी. चिदंबरम यांनी टि्वट करीत भाजपवर निशाणा साधला आहे. ''भाजप फक्त अपयशी मुख्यमंत्री बदलण्यात व्यग्र आहे. भाजपशासित राज्यात मुख्यमंत्री बदलाची यादी मोठी आहे,'' असे चिदंबरम यांनी म्हटलं आहे. ''मुख्यमंत्र्यांच्या कामाबाबत असमाधान व्यक्त करुन भाजपने अनेक राज्याचे मुख्यमंत्री आतापर्यंत बदलले आहेत. अजून काही राज्यात मुख्यमंत्री बदलण्याच्या तयारीत भाजप आहे. हरियाणा, गोवा, त्रिपुरा, अशी ही यादी मोठी आहे.'' असे चिदंबरम यांनी म्हटलं आहे. 
 
कॉग्रेसनेही आपल्या टि्वट हॅडलवरुन भाजपच्या मुख्यमंत्री बदलावर टीका होती. ''पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या विरोधात जनतेच्या मनात राग आहे. फक्त मुख्यमंत्री बदलून चालणार नाही, महागाई, बेरोजगारी, अपुरी आरोग्य यंत्रणा यांच्याकडे दुर्लक्ष करुन भाजपचा हा प्लॅन यशस्वी होणार नाही,'' असे टि्वट कॉग्रेसने केलं आहे. 
Edited by : Mangesh Mahale 
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in