डिजीटल इंडिया जीवनशैली बनली - नरेंद्र मोदी - Digital India Became New Life style claims Narendra Modi | Politics Marathi News - Sarkarnama

डिजीटल इंडिया जीवनशैली बनली - नरेंद्र मोदी

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 19 नोव्हेंबर 2020

डिजीटल इंडिया ही आता केवळ सरकारी योजना किंवा एखादे नवे तंत्रज्ञान राहिले नसून भारतीयांसाठी तो दैनंदिन जीवनशैलीचा भाग बनला आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले. पंतप्रधानांनी बंगळुरू तंत्रज्ञान शिखर बैठकीचे व्हिडियो कॉन्फरसिंगद्वारे उद्घाटन केले. त्यावेळी ते बोलत होते

नवी दिल्ली : डिजीटल इंडिया ही आता केवळ सरकारी योजना किंवा एखादे नवे तंत्रज्ञान राहिले नसून भारतीयांसाठी तो दैनंदिन जीवनशैलीचा भाग बनला आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले. पंतप्रधानांनी बंगळुरू तंत्रज्ञान शिखर बैठकीचे व्हिडियो कॉन्फरसिंगद्वारे उद्घाटन केले. त्यावेळी ते बोलत होते. कर्नाटकचे मुखयमंत्री बी एस येदियुरप्पा हेही सहभागी झाले होते.

तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारतीय युवकांमध्ये प्रचंड क्षमता आहे असे सांगून मोदी म्हणाले की लॉकडाऊनच्या काळात गरीबांपर्यंत त्वरित मदत पोचविण्यासाठी डिजीटल तंत्रज्ञानाची मोठी मदत झाली. डिजीटल इंडियामुळे देशाच्या विकासासाठी आणकी मानवीय दृष्टीकोन बाळगण्यास सुरवात झाली. डिजीटल युगात आमच्या जीवनातही अनेक बदल घडले आहेत व त्याचे फायदे आपण सारे जण पाहू शकतो. डिजीटल व्यवहारांमुळे विशेषतः गरीबांच्या जीवनात मोठे परिवर्तन आले आहे.

''भारताचे आयटी क्षेत्र हा देशासाठी गौरवाचा भाग आहे. आम्ही सर्वश्रेष्ठ काम करून देशाला त्याचा लाभ मिळवून देण्याची हीच योग्य वेळ आहे. त्यासाठी केंद्र सरकारने माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रावरील बोजा कमी करण्याचे पाऊल उचलले. सरकारी कचेऱ्यांतील फायली कालबाह्य होत आहेत. मागील वर्षी भारताने हॅकेथॉन आयोजित केले. आयटी क्षेत्रात अग्रेसर राहण्यासाठी भारत सज्ज झाला आहे. बुध्दिमत्तेच्या जोडीला भारताकडे जगातील सर्वांत मोठी बाजारपेठही आहे. औद्योगिक क्रांतीच्या युगातील कामगिरी आहेच पण आम्ही त्याला मागे टाकून आता माहितीच्या युगात आहोत. वेगवान बदलांचे हे क्षेत्र आहे,'' असेही मोदी म्हणाले. मात्र माहिती युगातील परिवर्तन अनेकदा विघटनकारीही ठरू शकते याची सावधगिरी बाळगली पाहिजे असाही इशारा त्यांनी दिला.
Edited By- Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख