गृहमंत्र्यांच्या भावाशी भांडलेले पोलिस उपमहानिरीक्षक निलंबित - Deputy Inspector General of Police suspended over quarrel with Home Ministers brother | Politics Marathi News - Sarkarnama

गृहमंत्र्यांच्या भावाशी भांडलेले पोलिस उपमहानिरीक्षक निलंबित

वृत्तसंस्था
बुधवार, 10 फेब्रुवारी 2021

वाढदिवसाच्या पार्टीमध्ये पोलिस उपमहानिरीक्षकांचा (डीआयजी) गृहमंत्र्यांच्या भावाशी किरकोळ कारणावरून वाद झाला होता.

चंदीगढ : वाढदिवसाच्या पार्टीमध्ये पोलिस उपमहानिरीक्षकांचा (डीआयजी) गृहमंत्र्यांच्या भावाशी किरकोळ कारणावरून वाद झाला. पार्टीतील लोकांनी मध्यस्थी करून हा वाद तिथेच मिटवला. पण गृहमंत्र्यांच्या भावाने नंतर उपमहानिरीक्षकांची तक्रार पोलिसांत दिली. त्यानंतर दोन दिवसांतच गृहमंत्र्यांनी उपमहानिरीक्षकांना थेट निलंबित केले.

हरियाणामध्ये हा प्रकार घडला आहे. गृहमंत्री अनिल विज यांचे भाऊ कपिल विज व डीआयजी अशोक कुमार यांच्यामध्ये वाद झाला होता. अनिल विज यांनी अशोक कुमार यांना मंगळवारी निलंबित केले. त्यांना निलंबनाच्या कालावधीत गुडगाव जवळीस भोंडसी क्षेत्रीय प्रशिक्षण केंद्रात पाठविण्यात आले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कपिल विज हे रविवारी दुपारी आपल्या मित्राच्या नातूच्या वाढदिवसाला गेले होते. अंबाला छावणी येथील सरहिंद क्लबमध्ये ही पार्टी होती. डीआयजी कुमारही या पार्टीमध्ये हजर होते. यादरम्यान दोघांमध्ये काही कारणांवरून वाद सुरू झाला. हा वाद वाढत असताना स्थानिक लोकांनी मध्यस्थी करून दोघांना शांत केले. हे प्रकरण तिथेच मिटले होते.

मात्र, कपिल विज यांनी सायंकाळी अंबाली छावणी पोलिस ठाण्यात जाऊन कुमार यांच्या विरोधात तक्रार दिली. आपल्यावर हल्ला करून धमकी दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. संबंधित व्यक्ती डीआयजी असल्याचे नंतर माहित झाले. पार्टीदरम्यान ते जवळ आले आणि कोणत्याही कारणाशिवाय शिवीगाळ सुरू केली, असे कपिल यांनी सांगितले.

दरम्यान, या तक्रारीनंतर कुमार यांनी सोमवारी अंबाला न्यायालयात केलेल्या अर्जावर त्यांना मंगळवारपयर्ंत अंतरिम जामीन देण्यात आला. कुमार यांचे वकील सतींद्र गर्ग यांनी सांगितले की, या प्रकरणाची पुढील सुनावणी 16 फेब्रुवारी रोजी होणार आहे. कुमार यांना आवश्यकतेनुसार पोलिस चौकशी करू देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 

या प्रकरणाला दोन दिवस झाल्यानंतर लगेचच गृहमंत्री अनिल विज यांनी डीआयजी अशोक कुमार यांना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला. गृह विभागाने याबाबतचा आदेश काढला आहे. निलंबनाच्या कालावधीत त्यांना भोंडसी येथील क्षेत्रीय प्रशिक्षण केंद्रात पाठविण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी एका कार्यक्रमातच स्टेजवरून तहसीलदारांना निलंबित करण्याचा आदेश दिला होता. सरकारी कार्यक्रम असूनही तहसीलदार व तलाठी कोणीच न आल्याने मिश्रा यांनी हे आदेश दिले. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख