दिल्ली पोलिसांना मिळाली तलवार अन् ढालही; हिंसाचारानंतर सरकारचा मोठा निर्णय - Delhi Police prepared with anti sword squad incase of violence during farmers protest | Politics Marathi News - Sarkarnama

दिल्ली पोलिसांना मिळाली तलवार अन् ढालही; हिंसाचारानंतर सरकारचा मोठा निर्णय

वृत्तसंस्था
सोमवार, 1 फेब्रुवारी 2021

दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारामध्ये काही आंदोलकांनी पोलिसांवर तलवारी उगारल्या होत्या. त्याचे व्हिडिओही समोर आले आहेत.

नवी दिल्ली : दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारामध्ये काही आंदोलकांनी पोलिसांवर तलवारी उगारल्या होत्या. त्याचे व्हिडिओही समोर आले आहेत. आता अशा घटनांचा सामना करण्यासाठी दिल्ली पोलिसांनीही लाठीच्या आकाराची तलवार आणि ढाल तयार केली आहे. हे शस्त्र नेहमीच्या तलवारीपेक्षा दुप्पट लांब असल्याने पोलिसांना स्वत:चा बचाव करणे शक्य होणार आहे.

प्रजासत्ताक दिनी कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीत शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढला होता. मात्र, या मोर्चादरम्यान दिल्लीत मोठा हिंसाचार झाला. काही ठिकाणी पोलिस व आंदोलक आमनेसामने आल्याने तणाव निर्माण झाला होता. आंदोलकांनी पोलिसांना मारहाण केल्याचा प्रकार घडला. तसेच पोलिसांकडूनही लाठीमार करण्यात आला. 

पोलिसांना लाल किल्ल्याच्या भिंतीवरून उड्या मारून आपला बचाव करावे लागला. काही ठिकाणी पोलिसांवर तलवार उगारण्यात आली होती. या हिंसाचारात सुमारे 400 पोलिस जखमी झाले आहेत. यातील बहुतेक जण आंदोलकांकडे असलेल्या हत्यारांमुळे हे जखमी झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

भविष्यात अशा घटनांपासून आपला बचाव करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी 'अॅन्टी स्वोर्ड स्कॉड' तयार केले आहे. या पथकाचे छायाचित्र सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे. यातील पोलिस कर्मचाऱ्यांना विशिष्ट प्रकारची तलवार  हातात दिसते. पण ही तलवार लाठीच्या आकारीची असून नेहमीच्या तलवारीपेक्षा दुप्पट लांब आहे.

पोलिसांच्या डाव्या हाताला सुरक्षेसाठी लोखंडी कवच दिसते. त्यामुळे हल्ला करणाऱ्यांना जवळही फिरकता येणार नाही, अशी रचना करण्यात आली आहे. दरम्यान, पोलिस अधिकाऱ्यांना या पथकासह नवीन शस्त्रावर बोलण्यास नकार दिला आहे. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख