ऑक्सिजनचा पुरवठा कोण रोखतेय? त्याला आम्ही फासावर देऊ..उच्च न्यायालय यंत्रणेवर संतप्त... - Delhi High Court today again criticized the government supply oxygen | Politics Marathi News - Sarkarnama

ऑक्सिजनचा पुरवठा कोण रोखतेय? त्याला आम्ही फासावर देऊ..उच्च न्यायालय यंत्रणेवर संतप्त...

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 24 एप्रिल 2021

ऑक्सिजनच्या पुरवठ्यावरून न्यायालयाने पुन्हा सरकारी यंत्रणेला धारेवर धरले.

नवी दिल्ली : दिल्लीत ऑक्सिजनअभावी रुग्णालयात दाखल करुन घेत नसल्याची सध्याची परिस्थिती आहे. काल मध्यरात्री ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे २० कोरोना रूग्णांना आपले प्राण गमवावे लागले. अनेक रुग्णालयांनी नोटीस काढून 'आम्ही कोरोना रुग्णांवर उपचार करण्यास असमर्थ आहोत,' असे म्हटलं आहे. प्रशासन आम्हाला सहकार्य करीत नसल्याचा आरोप रुग्णालय प्रशासनाने केला आहे. 

ऑक्सिजनच्या पुरवठ्यावरून आज उच्च न्यायालयाने पुन्हा सरकारी यंत्रणेला धारेवर धरले. केंद्र, राज्य अथवा स्थानिक प्रशासनाचा कोणताही अधिकारी ऑक्सिजनच्या पुरवठ्यामध्ये अडथळे आणत असेल तर आम्ही त्याला थेट फासावर चढवू ,असे खडे बोल न्यायालयाने प्रशासनाला सुनावले.  

केंद्राने दिल्लीला प्रतिदिन ४८० मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचे आश्‍वासन दिले आहे. हा ऑक्सिजन कधी येणार? याची माहिती आम्हाला देण्यात यावी, असे निर्देशही न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत. न्या. विपिन संघई आणि न्या रेखा पल्ली यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर आज याप्रकरणी सुनावणी पार पडली. 

दिल्लीतील महाराजा अग्रसेन रुग्णालयाने ऑक्सिजनच्या तुटवड्यावरून उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. ऑक्सिजनचा पुरवठा कोण रोखतेय ते आम्हाला दाखवून द्या आम्ही त्याला थेट फासावर देऊ. याबाबतीत कोणावर देखील दयामाया दाखविली जाणार नाही. दिल्ली सरकारने देखील स्थानिक प्रशासनातील अशा अधिकाऱ्यांची नावे केंद्राला कळवावीत तसे केल्याने या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करणे अधिक सोपे होईल, असेही न्यायालयाने नमूद केले. 

आयआयटी दिल्लीच्या अंदाजानुसार मे महिन्याच्या मध्यावधीत कोरोनाचा संसर्ग आणखी तीव्र रूप धारण करण्याची शक्यता आहे. ही लाट नाही तर सुनामी असेल. आता या महासंकटाचा सामना करण्यासाठी नेमक्या काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत अशी विचारणा देखील न्यायालयाने दिल्ली सरकारला केली आहे.

दिल्लीच्या गोल्डन जयपूर हॅास्पिटलमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे वीस कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. काल रात्री मध्यरात्री ही घटना घडली. हॅास्पिटलमध्ये ३.५ मेट्रीक टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी मंजूरी मिळावी होती. पण शुक्रवारी रात्री १५०० लिटर रीफिलिंग करण्यात आले. हा साठाही काल रात्री संपला. पुन्हा ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्याने ही दुर्घटना घडली, गोल्डन  जयपूर  हॉस्पिटलच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. डी.  के. बलुजा यांनी ही दिली माहिती.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख