कुणालाही करता येणार कोरोना चाचणी; जगाला दारं खुली होणार

भारतात सध्या RT-PCR आणि रॅपिड अँटीजन टेस्ट (RAT) या माध्यमातून कोरोनाच्या चाचण्या होतात.
covid19 ICMR efforts to enhance availability of covid testing kits
covid19 ICMR efforts to enhance availability of covid testing kits

नवी दिल्ली : भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला आहे. रुग्णसंख्या वाढू लागल्याने चाचणीसाठी रांगा लागत आहेत. प्रयोगशाळांवरील ताण वाढल्याने रिपोर्टही वेळेत मिळत नाहीत. कोरोनाचा संसर्ग वाढण्यास हेही कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे आता इंडियन कौन्सिल अॅाफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने देशातील कोरोना चाचणी प्रक्रियेला वेग आणण्यासाठी पावले टाकण्यास सुरूवात केली आहे.

भारतात सध्या RT-PCR आणि रॅपिड अँटीजन टेस्ट (RAT) या माध्यमातून कोरोनाच्या चाचण्या होतात. त्यातही केंद्र सरकारने RT-PCR ला अधिकाधिक प्राधान्य देण्याच्या सुचना केल्या आहेत. पण RT-PCR चाचणीचे अहवाल येण्यास विलंब होतो. तोपर्यंत संबंधित व्यक्तीकडून इतरांना संसर्ग होण्याचा धोका असतो. तर RAT चा रिपोर्ट काही मिनिटांत येत असला तरी लक्षणे असूनही निगेटिव्ह रिपोर्ट आल्यास त्यावर फारसा विश्वास ठेवला जात नाही.

याचा विचार करून ICMR ने आता कोरोना चाचणी कीट आणि इतर संबंधित गोष्टींसाठी  परवानगी दिली आहे. त्यामुळे जगातील कोणत्याही टेस्टिंग कीटचा वापर भारतात करता येणार आहे. त्यासाठी ड्रग कंट्रोलर जनरल अॅाफ इंडिया (DCGI) मान्यता घ्यावी लागणार नाही. याचा फायदा यूरोप, जपान, दक्षिण कोरिया, अॅास्ट्रेलिया, ब्राझीलसह जगातील अनेक देशांतील संस्था व कंपन्या आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) आपत्कालीन वापराच्या यादीत असलेल्या कंपन्यांना होणार आहे.

सध्या अमेरिकी खाद्य व औषधे नियामक (USFDA) प्राधिकरणाच्या कीटला भारतात मान्यतेतून सुट देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे इतर संस्था, कंपन्याना आता मान्यता घेण्याची गरज लागणार नाही. त्यामुळे भारतात विविध प्रकारे कोरोना चाचणी होऊ शकते. 

भारतीय चाचण्या चुकीच्या अथवा बिनभरवशाच्या

दरम्यान, भारतीय कोरोना चाचण्या चुकीच्या अथवा बिनभरवशाच्या आहेत, असे ऑस्ट्रेलियाने म्हटले आहे. भारताच्या कोरोना चाचण्यांबद्दल अतिशय गंभीर दावा करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. केंद्र सरकारने अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 

भारतातून ऑस्ट्रेलियात गेलेले प्रवासी तिथे पोचल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह आढळत आहेत. भारतातून परतलेले चार जण नुकतेच पॉझिटिव्ह आल्याची घटना पर्थमध्ये घडली होती. या पार्श्वभूमीवर बोलताना पश्चिम ऑस्ट्रेलिया राज्याचे प्रमुख मार्क मॅकगोवन म्हणाले की, ऑस्ट्रेलियात येणाऱ्या प्रवाशांच्या कोरोना चाचण्या भारतात केल्या जात आहेत. एक तर या चाचण्या चुकीच्या अथवा बिनभरवशाच्या आहेत. कारण ऑस्ट्रेलियात परतल्यानंतर प्रवासी पॉझिटिव्ह आढळत आहेत. भारतात चाचण्या सदोष असतील तर त्याचा परिणाम ऑस्ट्रेलियात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवण्यात होऊ शकतो.  

भारतात कोरोना चाचणी करुन विमानात बसलेला प्रवासी ऑस्ट्रेलियात पोचल्यानंतर पॉझिटिव्ह कसा येतो, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. भारतातून परतणाऱ्या प्रवाशांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढले असून, यामुळे सरकारची डोकेदुखी वाढली. ऑस्ट्रेलियात परतलेले 79 प्रवासी पॉझिटिव्ह आढळले असून, त्यातील 78 प्रवासी हे भारतातून आलेले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com