covid vaccination : मोहीम राबवायची कशी ?  भाजप शासीत राज्यांनीही हात झटकले... - covid vaccination: how to run a campaign | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

covid vaccination : मोहीम राबवायची कशी ?  भाजप शासीत राज्यांनीही हात झटकले...

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 30 एप्रिल 2021

लशीसाठी उद्यापासून गर्दी होण्याची चिंताही राज्यांना सतावू लागली आहे.

नवी दिल्ली : लशींचे डोस अपुरे अन् नव्या डोसचा पुरवठा देखील पुरेसा नसल्यामुळे १ मे पासून देशभरात ८ ते ४४ वयोगटामध्ये लसीकरण सुरू होत आहे.  केंद्राने तिसऱ्या टप्प्यात या वयोगटातील नागरिकांना लस देण्याची जबाबदारी राज्यांवर सोपविली आहे. यासाठी कोविन पोर्टलवर नोंदणी प्रक्रिया सुरू आहे.

आतापर्यंत दीड कोटीहून अधिक व्यक्तींनी  कोविन पोर्टलवर नावनोंदणी केली आहे. परंतु, लसवितरणाची जबाबदारी असलेल्या राज्यांना उत्पादक कंपन्यांकडूनच अद्याप पुरेशी लस मिळत नसल्याने मोहीम राबवायची कशी हा सवाल राज्यांचा आहे.  भाजपशासित राज्यांमध्येही लसीचा पुरेसा साठा पोहोचलेला नसल्याचे चित्र आहे.

विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांप्रमाणेच भाजप शासीत राज्यांनीही हे कारण पुढे करून हात झटकले आहे.  लशीसाठी उद्यापासून गर्दी होण्याची चिंताही राज्यांना सतावू लागली आहे. केंद्राने हस्तक्षेप करावा आणि या वयोगटाच्या लसीकरणासाठी प्राधान्यक्रम ठरवून द्यावा, अशी सूचनाही राज्यांकडून पुढे आली आहे.
 
देशातील १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी उद्यापासून (एक मे) लसीकरण मोहिमेची घोषणा झाली असली तरी लस तुटवड्यामुळे राज्यांनी आता या वयोगटातील नागरिकांना लगेच लसीकरणासाठी रांगा लावू नका, असे सांगण्यास सुरवात केली आहे.  

प्राधान्यक्रम ठरवा :भूपेश बघेल 
छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवून ही सूचना केली. राज्य सरकारने कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लशींचे प्रत्येकी २५-२५ लाख डोस उत्पादक कंपन्यांकडून मागितले. मात्र, छत्तीसगडला फक्त भारत बायोटेकचे उत्तर आले असून मागणीच्या तुलनेत केवळ तीन लाख लशींचा साठा या महिन्यात मिळेल असे सांगण्यात आले आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात नावनोंदणी झाल्याने लसीकरण केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ शकते आणि गर्दीच्या व्यवस्थापनाचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या वयोगटामधील लाभार्थ्यांचा प्राधान्यक्रम केंद्राने ठरवावा तसेच सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या वंचितांना प्राधान्य द्यावे अशी मागणी बघेल यांनी केली आहे. त्याचप्रमाणे या घटकांसाठी ऑनलाइन नोंदणीची अडचण लक्षात घेऊन वितरण केंद्रांवर नोंदणीचीही सुविधा द्यावी, असेही आवाहन बघेल यांनी केले आहे.

केंद्रांवर रांगा लावू नका : अरविंद केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही अशीच अडचण जाणवत आहे. लसीकरण केंद्रांवर रांगा लावू नयेत. लस उपलब्ध झाल्यानंतर वेळापत्रक जाहीर केले जाईल. दिल्ली सरकार उत्पादक कंपन्यांच्या संपर्कात आहे, मात्र अद्याप साठा पोहोचलेला नाही. येत्या दोन ते तीन दिवसांत कोविशिल्डचे तीन लाख डोस मिळण्याची शक्यता असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले. पंजाब, ओडिशा आणि महाराष्ट्रातही अशीच परिस्थिती आहे.  
 
गुजरात, कर्नाटकमध्येही हीच परिस्थिती

एक कोटी डोसची मागणी करणाऱ्या कर्नाटक सरकारपुढेही हीच परिस्थिती आहे. उद्या लसीसाठी गर्दी टाळावी, असे आवाहन कर्नाटकचे आरोग्यमंत्री के. सुधाकर यांना करावे लागले आहे. मागणी केलेल्या एक कोटी डोससाठी कंपन्यांकडून अद्याप उत्तर आलेले नाही. त्यामुळे साठा उपलब्ध झाल्यानंतर वितरणाचे वेळापत्रक कळवता येईल असेही कर्नाटक सरकारचे म्हणणे आहे. गुजरात सरकारनेही पुरेसा साठा मिळाल्यानंतरच लसीकरण करता येईल असा पवित्रा घेतला आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख