अमित शहा अडचणीत; बंगालमध्ये न्यायालयात व्हावे लागणार हजर... - Court summons Amit Shah in defamation case filed by TMC MP Abhishek Banerjee | Politics Marathi News - Sarkarnama

अमित शहा अडचणीत; बंगालमध्ये न्यायालयात व्हावे लागणार हजर...

वृत्तसंस्था
शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021

तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरूध्द अब्रुनुकसानीचा दावा केला आहे.

कोलकता : तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरूध्द अब्रुनुकसानीचा दावा केला आहे. या प्रकरणी पश्चिम बंगालमधील न्यायालयाने शहांना समन्स बजावले आहे. त्यांना २२ फेब्रुवारीला न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे. 

अभिषेक बॅनर्जी हे ममता बॅनर्जी यांचे भाचे आहेत. त्यांच्या वकिलाने प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ''अभिषेक बॅनर्जी यांच्याबद्दल अमित शहा यांनी ११ अॉगस्ट २०१८ रोजी भाजपच्या एका सभेत मानहानीकारक वक्तव्य केले होते.'' बंगालमधील बिधाननगर येथील खासदार-आमदारांसाठीच्या विशेष न्यायालयाने शहांना समन्स पाठविले आहे. 

हेही वाचा : मुख्यमंत्र्यांना डास चावल्याने इंजिनिअर निलंबित...

अमित शहा यांनी स्वत: किंवा त्यांच्या वकिलांमार्फत २२ तारखेला सकाळी १० वाजता न्यायालयात हजर राहावे लागणार असल्याचे समन्समध्ये मह्टले आहे. बंगालमध्ये ११ अॉगस्ट २०१८ रोजी भाजपकडून युवा स्वाभिमान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये बोलताना अमित शहा यांनी अभिषेक बॅनर्जी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. 

"शारदा, रोझ व्हॅली, संघटित भ्रष्टाचार, भाच्याचा भ्रष्टाचार, ममताजी यांची भ्रष्टाचाराची मालिका. गावामध्ये पैसे पोहचत आहेत का? पैसे कुठे जातात? मोदीजी पैसे पाठवत आहेत. कुठे गेले ३ कोटी ५९ लाख रुपये. हा पैसा भाच्याला आणि टोळीला बक्षिस देण्यात आला,'' असे अमित शहा रॅलीमध्ये म्हटल्याचे बॅनर्जी यांनी केलेल्या अब्रुनुकसानीच्या दाव्यात नमुद करण्यात आले आहे. 

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप व तृणमूल काँग्रेसकडून एकमेकांवर जोरदार टीका केली जात आहे. अमित शहा दोन दिवसांच्या बंगाल दौऱ्यावर असून त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर टीकेचे बाण सोडले आहेत. तर ममतांकडून त्यावर पलटवार करण्यात आला असून त्यांनी अमित शहांना अभिषेक बॅनर्जी यांच्याविरोधात निवडणूक लढविण्याचे आव्हान दिले आहे. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख