दाद मागण्यासाठी गेलेल्या जनतेला भाजपचा मंत्री म्हणाला, जाऊन मरा!  - Controversial statement of Madhya Pradesh Education Minister | Politics Marathi News - Sarkarnama

दाद मागण्यासाठी गेलेल्या जनतेला भाजपचा मंत्री म्हणाला, जाऊन मरा! 

वृत्तसंस्था
बुधवार, 30 जून 2021

विरोधी पक्ष काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत इंदरसिंह परमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये (Madhya Pradesh) शाळांकडून अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्याची तक्रार करण्यासाठी गेलेल्या पालक संघटनेला शाळेय शिक्षणमंत्री इंदरसिंह परमार यांनी दिलेल्या उत्तरामुळे वाद निर्माण झाला आहे. पालकांनी शिक्षण मंत्र्यांना विचारले शिक्षण विभाग आमचे म्हणणे ऐकून घेणार नसेल तर काय करावे त्यावर इंदरसिंह यांनी जाऊन मरा असे उत्तर दिले. यामुळे पालकांनी संताप व्यक्त केला. विरोधी पक्ष काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत इंदरसिंह परमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. (Controversial statement of Madhya Pradesh Education Minister) 

मध्य प्रदेश पालक महासंघाच्या नेतृत्वात ९० ते १०० पालक परमार यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. पालकांनी उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही शाळा जास्त फी घेत असल्याची तक्रार केली. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने कोरोना महामारीदरम्यान शाळांना अतिरिक्त फी घेऊ नये असा आदेश दिला आहे.

हेही वाचा : फडणवीसांनी राजकीय संन्यास घ्यावाच; त्यामुळे मराठी माणसाचा जाच तरी संपेल

पालकांनी परमार यांना मध्यस्थी करत फी कमी करण्यासाठी मदतीची विनंती केली. कोरोना संकटामुळे सध्या दैनंदिन खर्च भागवताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत असल्याचेही त्यांनी सांगितले. शाळा आणि शिक्षण विभागच आपले ऐकून घेत नसेल तर काय करावे असे पालकांनी विचारले असता चिडलेल्या परमार यांनी, ''जा आणि मरा…तुमची जी इच्छा आहे ते करा,'' असे उत्तर पालकांना दिले. 

हेही वाचा : महाविकास आघाडीत मोठी घडामोड : शिवसेना आमदारांना व्हीप जारी....

पालक महासंघाचे अध्यक्ष कमल विश्वकर्मा यांनी परमार यांनी पालकांची माफी मागितली पाहिजे तसेच गाऱ्हाणे ऐकण्याची इच्छा नसेल तर राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. काँग्रेसचे प्रवक्ते नरेंद्र सलुजा यांनीदेखील टीका केली असून परमार यांना निर्लज्ज म्हटले आहे. त्यांची मंत्री मंडळातून तात्काळ हकालपट्टी केली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. 

Edited By - Amol Jaybhaye  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख