भाजपचा सुपडा साफ; सातही महापालिकांवर काँग्रेसचे वर्चस्व...

सात महापालिकांच्या मतमोजणीमध्ये भाजपला एकाही ठिकाणी खाते खोलता आले नाही.
Congress wins in seven municipal corporation election
Congress wins in seven municipal corporation election

चंदीगढ : पंजाबमधील महापालिका व नगर परिषदांच्या निवडणुकीत भाजपचा सुपडा साफ झाला आहे. आज झालेल्या सात महापालिकांच्या मतमोजणीमध्ये भाजपला एकाही ठिकाणी खाते खोलता आले नाही. सातही महापालिकांवर काँग्रेसने वर्चस्व मिळविले आहे. तर भठिंडा महापालिका तब्बल ५३ वर्षांनंतर काँग्रेसच्या ताब्यात आली आहे.

पंजाबमधील १०९ नगर परिषद व नगर पंचायत आणि सात महापालिकांसाठी १४ फेब्रुवारीला मतदान झाले होते. जवळपास ७१ टक्के मतदान झाले असून आज मतमोजणी सुरू आहे. त्यामध्ये काँग्रेसला सर्वच ठिकाणी आघाडी मिळताना दिसत आहे. या निवडणुकीत ९ हजार २२२ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामध्ये सर्वाधिक २ हजार ८३१ उमेदवार अपक्ष असून काँग्रेसने २ हजार ३७ उमेदवार उभे केले होते. भाजपचे केवळ १ हजार ३ उमेदवार नशीब अजमावत आहेत. यावेळी भाजपने शिरोमणी अकाली दलाशी आघाडी केलेली नाही. अकाली दलाने १ हजार ५६९ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. मोहाली महापालिकेतील दोन केंद्रांवर आज पुन्हा मतदान होत आहे. 

आज सुरू असलेल्या मतमोजणीमध्ये भाजपला मोठा दणका बसला आहे. शिरोमणी अकाली दलाने आधीच साथ सोडल्याने भाजप पिछाडीवर पडली होती. शेतकरी आंदोलनाचा फटकाही भाजला बसला आहे. त्यामुळे सात महापालिकांच्या निवडणुकीत भाजपला एकही महापालिका मिळालेली नाही. सातही ठिकाणी काँग्रेसने सत्ता मिळविली आहे. मोगा, होशियारपुर, कपूरथला, अबोहर, पठाणकोट, बटाला आणि बठिंडा या महापालिकांवर काँग्रेसने झेंडा फडकावला आहे. 

बठिंडा लोकसभा मतदारसंघात शिरोमणी अकाली दलाच्या हरसिमरत बादल खासदार आहेत. ही महापालिका ५३ वर्षानंतर काँग्रेसला मिळाली आहे. कृषी कायद्यांना विरोध म्हणून अकाली दलाने भाजपची साथ सोडली आहे. बठिंडा शहर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे मनप्रीत सिंह बादल आमदार असून ते राज्याचे अर्थमंत्रीही आहेत. तर अकाली दलाचे फ्रमुख सुखबीर सिंह बादल यांचे ते चुलत भाऊ आहेत. 

शेतकरी आंदोलनामध्ये पंजाब व हरियाणातील शेतकरी अधिक आहे. मागील अडीच महिन्यांपासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. पण कृषी कायद्यांबाबत केंद्र सरकारने अद्याप कोणताही तोडगा काढला नाही. त्यामुळे पंजाबमध्ये भाजपविषयी नाराजी आहे. त्यातच अकाली दलानेही साथ सोडल्याने भाजपला या निवडणुकीत जोरदार झटका बसणार असे बोलले जात होते. आजच्या निकालावरून हेच दिसून येत असल्याचा दावा केला जात आहे. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com