कॉंग्रेस, तेजस्वींनी नीतीशकुमारांना पाठिंबा द्यावा : जीतन राम मांझी 

कॉंग्रेस आणि नीतीशकुमार यांची धोरणे काही वेगळी नाहीत.
Congress, Tejaswi should support Nitish Kumar: Jeetan Ram Manjhi
Congress, Tejaswi should support Nitish Kumar: Jeetan Ram Manjhi

पाटणा : बिहारच्या विकासासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाने मुख्यमंत्री नीतीशकुमार यांना पाठिंबा द्यावा. कॉंग्रेस आणि नीतीशकुमार यांची धोरणे काही वेगळी नाहीत, ती एकच आहेत. नीतीशकुमार हे सर्वांचे नेते आहेत, अशा शब्दांत बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि "एनडीए'तील हिंदुस्थान अवाम मोर्चाचे प्रमुख जीतन राम मांझी यांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलास ऑफर दिली. 

बिहार विधानसभा निवडणुकीत "एनडीए'ने बहुमत मिळविले आहे. मात्र, या वेळी भाजपने नीतीशकुमार यांच्या "जदयू'पेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रिपदावरून तर्कवितर्क लढविले जात आहेत. कमी जागा जिंकणारे नीतीशकुमार मुख्यमंत्रीपद स्वीकारणार का? अशी चर्चा सुरू आहे. 

दरम्यान, नीतीशकुमार हेच मुख्यमंत्री होतील, असे भाजपच्या नेत्यांकडून वारंवार सांगितले जात आहे. पण, सत्तेचा वाटप करताना जादा आणि महत्त्वाची मंत्रिपदे भाजपकडे ठेवू शकतो. म्हणजेच नीतीशकुमार हे जरी मुख्यमंत्री झाले तरी त्यांना राज्याचा कारभार करताना भाजपच्या कलानेच करावा लागणार आहे. त्यामुळे नीतीशकुमार हे भाजपच्या हातातील बाहुले बनणार का?, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. तसेच, निकाल लागून 48 तास झाले तरी नीतीशकुमार यांनी पक्षाच्या कामगिरीबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. 

दरम्यान, राष्ट्रीय जनता दलाच्या नवनिर्वाचित आमदारांच्या आज झालेल्या बैठकीत तेजस्वी यादव यांची अपेक्षेप्रमाणे नेतेपदी निवड करण्यात आली आहे. नेतेपदी निवड झाल्यानंतर तेजस्वी यादव यांनी महागठबंधनचेच सरकार येणार असा दावा आमदारांच्या बैठकीत केला आहे. त्यामुळे राजकीय आघाडी-बिघाडीच्या शक्‍यता वर्तविल्या जात आहेत. 

दुसरीकडे महाराष्ट्रातील शिवसेनेचे नेतेही बिहारात वेगळे समीकरण बघायला मिळाले तर आश्‍चर्य वाटणार नाही, असे सांगत आहेत. त्यामुळे एकूणच बिहारच्या मुख्यमंत्रीपदाबाबत राजकीय वर्तुळाची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. 

या सर्व घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर नीतीशकुमार यांचे एकेकाळची सहकारी आणि सध्या हिंदुस्थान अवाम मोर्चाचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी थेट राष्ट्रीय जनता दल आणि कॉंग्रेस पक्षाला नीतीशकुमार यांच्यासोबत येण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. 

मुख्यमंत्रिपदाबाबत एनडीए निर्णय घेईल : नीतीशकुमार 

दरम्यान, बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत मी कोणताही दावा केलेला नाही. त्याबाबतचा निर्णय "एनडीए' घेईल. शपथविधीबाबत अजून काहीचं ठरलेले नाही. दिवाळीला होणार की छठपूजेला याबाबत काही ठरवलेलं नाही. सध्या निवडणूक निकालाची समीक्षा केली जात आहे. चारही पक्षाचे नेते उद्या बैठक घेणार आहेत, अशी माहिती खुद्द नीतिशकुमार यांनी दिली. लोकांनी एनडीएला स्पष्ट बहुमत दिले आहे आणि एनडीए सरकार स्थापन करेल, असेही त्यांनी नमूद केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com