काँग्रेसचे 'बल्ले बल्ले'; या राज्यात भाजपला जोरदार झटका... - Congress surges ahead in punjab municipal election | Politics Marathi News - Sarkarnama

काँग्रेसचे 'बल्ले बल्ले'; या राज्यात भाजपला जोरदार झटका...

वृत्तसंस्था
बुधवार, 17 फेब्रुवारी 2021

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या निवडणुकीच्या निकालाकडे काँग्रेससह भाजपाचेही लक्ष लागले आहे.

चंदीगढ : पंजाबमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस बहुतेक ठिकाणी आघीडावर आहे. मात्र, या निवडणुकीत भाजपला मोठा झटका बसला आहे. अनेक ठिकाणी भाजपचे उमेदवार पिछाडीवर आहेत. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या निवडणुकीच्या निकालाकडे काँग्रेससह भाजपाचेही लक्ष लागले आहे.

पंजाबमधील १०९ नगर परिषद व नगर पंचायत आणि सात महापालिकांसाठी १४ फेब्रुवारीला मतदान झाले होते. जवळपास ७१ टक्के मतदान झाले असून आज मतमोजणी सुरू आहे. त्यामध्ये काँग्रेसला सर्वच ठिकाणी आघाडी मिळताना दिसत आहे. या निवडणुकीत ९ हजार २२२ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामध्ये सर्वाधिक २ हजार ८३१ उमेदवार अपक्ष असून काँग्रेसने २ हजार ३७ उमेदवार उभे केले होते. भाजपचे केवळ १ हजार ३ उमेदवार नशीब अजमावत आहेत. यावेळी भाजपने शिरोमणी अकाली दलाशी आघाडी केलेली नाही. अकाली दलाने १ हजार ५६९ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. 

आतापर्यंत हाती आलेल्या निकालामध्ये काँग्रेसने नऊ महापालिकांपैकी पाच महापालिकांवर कब्जा केला आहे. गुरदासपुरमध्ये २९ वॉर्डपैकी १५ ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर अद्याप अन्य पक्षाने खातेही खोलले नाही. फिरोजपुर नगरपालिकेत ३३ पैकी १७ जागांवर काँग्रेसने विजय मिळवला आहे. करतारपूरमध्ये अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली असून १५ पैकी ८ जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेसला सहा जागा मिळाल्या आहेत. 

हेही वाचा : श्रीलंकेपाठोपाठ नेपाळमध्येही फुलणार नाही 'कमळ'...

पटियालामधील विविध नगरपालिकांमध्येही अनेक ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. काँग्रेसपाठोपाठ अकाली दलाने आघाडी घेतल्याचे चित्र आहे. भाजपचे उमेदवार मात्र बहुतेक ठिकाणी पिछाडीवर दिसत आहे. अनेक ठिकाणी अपक्ष उमेदवारही भाजपच्या उमेदवारांपेक्षा पुढे आहे. आपही या निवडणुकीत पिछाडीवर पडले आहे.

शेतकरी आंदोलनामध्ये पंजाब व हरियाणातील शेतकरी अधिक आहे. मागील अडीच महिन्यांपासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. पण कृषी कायद्यांबाबत केंद्र सरकारने अद्याप कोणताही तोडगा काढला नाही. त्यामुळे पंजाबमध्ये भाजपविषयी नाराजी आहे. त्यातच अकाली दलानेही साथ सोडल्याने भाजपला या निवडणुकीत जोरदार झटका बसणार असे बोलले जात होते. आजच्या निकालावरून हेच दिसून येत असल्याचा दावा केला जात आहे. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख