Congress says, 'Write it down, Kamal Nath will form the cabinet' | Sarkarnama

कॉंग्रेस म्हणतोय, 'लिहून ठेवा, एमपीत कमलनाथच मंत्रिमंडळ बनविणार ' 

वृत्तसंस्था
बुधवार, 1 जुलै 2020

मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली मध्य प्रदेशमध्ये सत्तेवर आलेल्या भाजप सरकारला मंत्रिमंडळ विस्तारासाठी अद्याप मुहूर्त मिळालेला दिसत नाही. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला मंत्रिमंडळ विस्तार अद्याप होऊ शकलेला नाही. 

भोपाळ : मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली मध्य प्रदेशमध्ये सत्तेवर आलेल्या भाजप सरकारला मंत्रिमंडळ विस्तारासाठी अद्याप मुहूर्त मिळालेला दिसत नाही. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला मंत्रिमंडळ विस्तार अद्याप होऊ शकलेला नाही. 

दरम्यान, मुख्यमंत्री चौहान यांनी मंगळवारी (ता. 30 जून) पत्रकारांशी बोलताना सांगितले की, मंत्रिमंडळाचा विस्तार बुधवारीही (ता. 1 जुलै) होणार नाही. त्यामुळे मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या आमदारांना आणखी काही दिवस वाट पाहवी लागणार आहे. 

उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडे मध्य प्रदेशचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. त्यामुळे त्या आज (1 जुलै) भोपाळमध्ये येत आहेत. राजभवनाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पटेल आज दुपारी साडेतीनपर्यंत भोपाळमध्ये येतील. त्यानंतर त्या दुपारी साडेचारच्या सुमारास मध्य प्रदेशाच्या राज्यपाल म्हणून शपथ घेतील. 

मुख्यमंत्री चौहान हे मंगळवारी (ता. 30 जून) भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयात आले होते. त्या वेळी त्यांनी पत्रकारांच्या प्रश्‍नांना उत्तर देताना सांगितले की, मंत्रिमंडळाचा विस्तार बुधवारीही (1 जुलै) होणार नाही. पण, तो लवकरच होईल. मुख्यमंत्र्यांनी या वेळी बोलताना कॅबिनेटचा विस्तार नेमका कधी होणार, हे मात्र सांगितले नाही. दरम्यान, येत्या गुरुवारी (ता. 2 जुलै) मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. 

शिवराजसिंह चौहान हे मंगळवारी सकाळीच दिल्लीचा दौरा करून भोपाळमध्ये दाखल झाले होते. त्यांनी दिवसभर कोरोनाच्या संदर्भात मंत्रालयात अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. त्यात त्यांनी राज्यातील कोरोनाची सद्यस्थिती आणि उपाय योजनांबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करून काही सूचनाही केल्या. त्यानंतर चौहान यांनी भाजपच्या प्रदेश कार्यालयात येऊन पत्रकारांशी बातचित केली. दरम्यान राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा हे सोमवारपासून दिल्लीत ठाण मांडून आहेत. 

दुसरीकडे, कॉंग्रेसमधून भाजपत दाखल झालेले ज्योतिरादित्य शिंदे यांचे भोपाळमध्ये कधी येणार, हे अद्याप निश्‍चित नाही. पण, त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे की बुधवारी सायंकाळी अथवा गुरुवारी (ता. 2 जुलै) सकाळी शिंदे हे भोपाळमध्ये येतील. परंतु त्यांचा अधिकृत दौरा अद्याप जाहीर झालेला नाही. 

मंत्रिमंडळ विस्ताराच्या या घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसने भाजपवर निशाना साधला आहे. मध्य प्रदेश कॉंग्रेसने याबाबत ट्विट करताना म्हटले आहे की, भाजपला शंभर दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार करता आला नाही. अशांकडून काही जण विकासाची अपेक्षा ठेवून होते. दुसऱ्या एका ट्‌विटमध्ये कॉंग्रेसने म्हटले आहे की "लिहून ठेवा, मध्य प्रदेशमध्ये केवळ कमलनाथच मंत्रिमंडळ स्थापन करतील.' 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख