चंदीगढ : पंजाबमधील महापालिका व नगर परिषदांच्या निवडणुकांत काही धक्कादायक निकालांची नोंद झाली आहे. या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा वरचष्मा असला तरी त्यांच्या एका आमदाराच्या पत्नीलाच पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तसेच भाजप व शिरोमणी अकाली दलालाही मोठा झटका बसला आहे.
पंजामधील निवडणूकीत आतापर्यंत झालेल्या मतमोजणीमध्ये काँग्रेसचा दबदबा राहिला आहे. भाजप, अकाली दल आणि आपचा अनेक ठिकाणी दारुण पराभव झाला आहे. भाजपचे अनेक उमेदवार अपक्षांकडूनही पराभूत झाल्याचे दिसते. तर काही ठिकाणी धक्कादायक निकालही लागले आहेत. आठ महापालिकांपैकी काँग्रेसला आतापर्यंत पाच महापालिकेत सत्ता मिळाली आहे. त्यामध्ये भटिंडा, होशियारपुर आणि पठाणकोट या महत्वाचा पालिकांचा समावेश आहे. मोगा, मोहली या पालिकांची मतमोजणी सुरू आहे.
हेही वाचा : स्मृती इराणींनी राहुल गांधींना दिलं आव्हान...
मोगा महापालिका निवडणुकीत काँग्रेसला जोरदार झटका बसला आहे. स्थानिक आमदार डॉ. हरजोत कमल यांच्या पत्नीचा केवळ १८० मतांनी पराभव झाला आहे. अकाली दलाच्या उमेदवार डॉ. रजिंदर कौल यांनी त्यांचा पराभव केला आहे. शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंह बादल यांनाही झटका बसला आहे. फिरोजपुरमध्ये बादल यांनी त्यांच्या मतदारांचा प्रचार केला होता. पण तिथे अकाली दलासह भाजपला खातेही खोलता आले नाही. अद्याप याठिकाणी मतमोजणी सुरू आहे.
काँग्रेसचे बल्ले बल्ले; या राज्यात भाजपला जोरदार झटका... #Sarkarnama #PunjabMunicipalElection2021 #Congress #BJP #PunjabElections @INCMaharashtrahttps://t.co/Loy28qsxNF
— Sarkarnama (@SarkarnamaNews) February 17, 2021
होशियारपुरमधील १० वॉर्डातील निकाल जाहीर झाले आहेत. त्यातील वॉर्ड क्रमांक पाचमधून भाजप नेते तीक्ष्ण सूद यांच्या पत्नी राकेश सूद निवडणूक लढवत होत्या. त्यांचा अपक्ष उमेदवार गुरप्रीत सचदेवा यांनी मोठ्या मताधिक्याने पराभव केला आहे.
शेतकरी आंदोलनामध्ये पंजाब व हरियाणातील शेतकरी अधिक आहेत. मागील अडीच महिन्यांपासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. पण कृषी कायद्यांबाबत केंद्र सरकारने अद्याप कोणताही तोडगा काढला नाही. त्यामुळे पंजाबमध्ये भाजपविषयी नाराजी आहे. त्यातच अकाली दलानेही साथ सोडल्याने भाजपला या निवडणुकीत जोरदार झटका बसणार असे बोलले जात होते. आजच्या निकालावरून हेच दिसून येत असल्याचा दावा केला जात आहे.
Edited By Rajanand More

