बेंगलुरू : कर्नाटकमधील काँग्रेसचे आमदार प्रकाश राठोड हे विधान परिषदेतच मोबाईलवर पॉर्न व्हिडिओ आणि छायाचित्र पाहत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेची व्हिडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. राठोड यांनी मात्र आपण कसलेही व्हिडिओ पाहिले नसल्याचा दावा केला आहे.
कर्नाटकातील विधानसभेत आमदार अश्लिल व्हिडिओ पाहत असल्याचा प्रकार यापुर्वीही घडला आहे. असे प्रकार सातत्याने घडू लागल्याने आमदारांवर टीका होऊ लागली आहे. राठोड यांच्या व्हायरल क्लीपमध्ये ते मोबाईलमधील छायाचित्र, व्हिडिओ पाहत असल्याचे दिसत आहे. त्यामध्ये काही पॉर्न व्हिडिओही आहेत.
राठोड यांनी आपण पॉर्न व्हिडिओ पाहत नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. मोबाईलचे स्टोअरेज पुर्ण भरले होते. त्यामुळे काही माहिती डिलिट करत होतो. मला विधान परिषदेत काही प्रश्न उपस्थित करायचे होते. ती माहिती मोबाईलमध्येच होती, असे त्यांनी म्हटले आहे.
भाजपचे प्रवक्ते एस प्रकाश यांनी राठोड यांच्यावर टीका केली आहे. राठोड यांनी आज सभागृहाची प्रतिमा मलीन केली आहे. काँग्रेसने त्यांना निलंबित करावे. आमचा पक्षही हा मुद्दा विधान परिषेदच्या अध्यक्षांपर्यंत नेईल. राठोड पॉर्न व्हिडिओ पाहत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे, असे एस प्रकाश म्हणाले.

