जयराम रमेश यांचा मोदी सरकारला टोमणा...नवे संसद भवन पेंटागॉनसारखेच.. - Congress leader jayram Ramesh criticizes Modi Government new parliament Building | Politics Marathi News - Sarkarnama

जयराम रमेश यांचा मोदी सरकारला टोमणा...नवे संसद भवन पेंटागॉनसारखेच..

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 11 डिसेंबर 2020

जयराम रमेश यांनी जुने आणि नवे संसद भवनातील साम्य दाखविण्यासाठी दोन्ही भवनाचे इमारतींचे फोटो आपल्या टि्वट अंकाऊटवरून शेअर केले आहेत.

नवी दिल्ली : भारताच्या स्वातंत्र्याला 2022 मध्येच 75 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे स्वातंत्र्याचा हा उत्सव नव्या संसद भवनातच साजरा करण्याचा मोदी सरकारचा उद्देश आहे. या पार्श्वभूमीवर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या संसद भवनाचे भूमिपूजन केलं. या नव्या संसद भवनाविषयी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी मोदी सरकारला टोला लगावला आहे. 

नव्या संसद भवनाच्या भूमीपूजनानंतर नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भय संसद भवन असा उल्लेख केला आहे, यावरून जयराम रमेश यांनी मोदींवर खोचक टीका केली आहे. जयराम रमेश यांनी जुने आणि नवे संसद भवनातील साम्य दाखविण्यासाठी दोन्ही भवनाचे इमारतींचे फोटो आपल्या टि्वट अंकाऊटवरून शेअर केले आहेत. सध्याच्या संसद भवन आणि चौसठ योगिनी मंदिराचेही फोटोही जयराम रमेश यांनी शेअर केले आहेत.

आपल्या टि्वटमध्ये जयराम रमेश म्हणतात, ''इंग्रजांनी बनवलेल्या सध्याच्या संसद भवनाचं डिझाइन मध्य प्रदेशच्या मुरैना येथील चौसठ योगिनी मंदिराप्रमाणे आहे. पण, नवीन आत्मनिर्भर संसद भवनाची डिझाइन मात्र वॉशिंग्टन डीसी येथील पँटागॉनप्रमाणे आहे."

"संसदेत बनलेला प्रत्येक कायदा हा लोकशाहीचा वारसा आहे. नवं संसद भवन हे आत्मनिर्भर भारताची ओळख ठरेल," असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल व्यक्त केला. ‘सेंट्रल व्हिस्टा’ प्रकल्पाअंतर्गत नव्या संसद भवनाचे भूमिपूजन काल झाले. त्यावेळी ते बोलत होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "हे नवं संसद भवन जनकल्याणाचं काम करेल.संसद भवनाच्या नव्या इमारतीमुळे कार्यक्षमता वाढेल. या इमातीत प्रत्येक खासदारासाठी स्वतंत्र कार्यालय असणार आहे. नवीन संसद भवन हे जुनं आणि नव्याचा मिलाफ आहे. राष्ट्राचा विकासासाठी राज्याचा विकास करणं गरजेचे आहे." 
 
भारताच्या स्वातंत्र्याला 2022 मध्येच 75 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे स्वातंत्र्याचा हा उत्सव नव्या संसद भवनातच साजरा करण्याचा मोदी सरकारचा उद्देश आहे. नवीन संसद भवनाची इमारत चार मजली असणार आहे. संसदेच्या या नव्या इमारतीचा विस्तार जवळपास 65,000 चौरसमीटर इतका आहे. या इमारतीचं 16921 चौरसमीटर बांधकाम जमिनीखालीही होणार आहे.
 
नव्या इमारतीसाठी 971 कोटींचा खर्च येणार आहे. नव्या संसद भवनात एक संविधान हॉल असणार आहे. खासदारांना ग्रंथालय, वेगवेगळ्या समित्यांसाठी वेगवेगळ्या खोल्या, खाण्याची प्रशस्त सुविधा आणि वाहनांच्या पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. 2022 पर्यंत हे काम पूर्ण होण्याचं ध्येय ठेवण्यात आलं आहे. हे बांधकाम सध्याच्या संसद भवनाच्या परिसरातच होणार आहे. खासदारांना ग्रंथालय, वेगवेगळ्या समित्यांसाठी वेगवेगळ्या खोल्या, खाण्याची प्रशस्त सुविधा आणि वाहनांच्या पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था नव्या संसद भवनात करण्यात येणार आहे. नवीन संसद भवनासाठी ९७१ कोटींच्या निधी  मंजूर करण्यात आलेला आहे. नवीन संसद भवनाच्या उभारणीचं कंत्राट ‘टाटा प्रोजेक्ट लिमिटेड’कडे देण्यात आले आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख