अहमद पटेल कोरोना संक्रमणामुळे रुग्णालयात - Congress Leader Ahmed Patel Admitted in Hospital due to corona | Politics Marathi News - Sarkarnama

अहमद पटेल कोरोना संक्रमणामुळे रुग्णालयात

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 16 नोव्हेंबर 2020

कोरोना संक्रमणामुळे प्रकृतीत बिघाड झालेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार अहमद पटेल यांना गुरुग्राममधील मेदांता हाॅस्पिटलच्या अतिदक्षता विभागात हलविण्यात आले आहे. त्यांचे पुत्र फैजल पटेल यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे.

नवी दिल्ली : कोरोना संक्रमणामुळे प्रकृतीत बिघाड झालेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार अहमद पटेल यांना गुरुग्राममधील मेदांता हाॅस्पिटलच्या अतिदक्षता विभागात हलविण्यात आले आहे. त्यांचे पुत्र फैजल पटेल यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे.

कोरोना संक्रमण झाल्यामुळे काही दिवसांपूर्वी अहमद पटेल यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर प्रकृतीमध्ये बऱ्यापैकी सुधारणाही झाली होती मात्र, आता पुढील उपचारांसाठी अतिदक्षता विभागात हलविण्यात आले आहे. त्यांचे कुटुंबिय या नात्याने ही माहिती देत असल्याचे फैजल पटेल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. काही आठवड्यांपूर्वी अहमद पटेल कोविड पाॅझिटिव्ह आढळून आले होते. त्यांना आता आयसीयुमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती वैद्यकीय देखरेखीखाली स्थिर आहे. याच ट्वीटर हॅंडलवरून त्यांच्या प्रकृतीबद्दलची माहिती दिली जाईल, असेही फैजल पटेल यांनी म्हटले आहे.

दरम्यान, अहमद पटेल अतिदक्षता विभागात दाखल झाल्याचे कळाल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना केली आहे. शशी थरूर यांनी पटेल यांना राजकारणातील असाधारण व्यक्तिमत्व संबोधणारे ट्विट केले. अहमद पटेल यांनी अनेक विजय मिळवले आहेत. यातून बरे होऊन आणखी एक विजय मिळवतील, असे थरुर यांनी म्हटले आहे. 

तर, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी अहमद पटेल यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करताना ते लवकरच बरे होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. राजस्थानमधील काँग्रेस नेते सचीन पायलट, युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बी व्ही, आनंद शर्मा, मनीष तिवारी, कार्ती चिदंबरम, महाराष्ट्राचे सह प्रभारी आशीष दुवा यांनीही ट्विट करून अहमद पटेल यांच्या प्रकृतीसुधारणेसाठी प्रार्थना केली आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख