भाजपसमोर काँग्रेसचं लोटांगण; प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा

गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने बहुतेक ठिकाणीवर्चस्व मिळविले आहे.
Congress defeat in Gujarat Local Body Election
Congress defeat in Gujarat Local Body Election

अहमदाबाद : गुजरातमधील जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकांच्या निवडणुकीत भाजपने काँग्रेसचा दारूण पराभव केला आहे. अनेक ठिकाणी भाजपने एकहाती सत्ता मिळवली असून काँग्रेसचा सुपाडा साफ झाला आहे. हा पराभव काँग्रेसच्या जिव्हारी लागला असून प्रदेशाध्यक्ष अमित छावडा यांनी पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे.

महापालिका निवडणुकांमध्ये वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर भाजपने गुजरातमधील जिल्हा परिषद, नगरपालिका आणि पंचायत समित्यांमध्ये काँग्रेसला धोबीपछाड केले आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निवडणुक निकालांध्ये भाजपने ग्रामीण भागातही आपला वरचष्मा असल्याचे पुन्हा दाखवून दिले आहे. 

गुजरातमधील सहा महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल काही दिवसांपूर्वीच जाहीर झाले आहेत. सहाही महापालिकांमध्ये भाजपचे कमळ फुलले आहे. या निवडणुकीत काँग्रेसचा सुपडा साफ झाला. तर आपने सुरत महापालिकेत जोरदार एंन्ट्री केली. रविवारी गुजरातमधील 81 नगरपालिका, 31 जिल्हा परिषदा आणि 231 पंचायत समित्यांची निवडणुक झाली. आज मतमोजणी सुरू असून आतापर्यंत हाती आलेल्या निकालांमध्ये भाजपने मुसंडी मारल्याचे दिसते. 

आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार, भाजपने नगरपालिकांमध्ये 1 हजार 967 जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेसला केवळ 356 जागाच मिळवता आल्या. आपने या निवडणुकीत पहिल्यांदाच उमेदवार उतरविले होते. त्यांनी 9 जागा जिंकल्या आहेत. जिल्हा परिषदांमध्ये भाजपचे 735 उमेदवार विजयी झाले आहेत. तर काँग्रेसचे जेमतेम 157 उमेदवार निवडूण आले. आपलाही केवळ 2 जागा मिळाल्या. 

या पराभवाची जबाबदारी स्वीकारत काँग्रेसचे गुजरात प्रदेशाध्यक्ष अमित छावडा यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच पक्षाचे विधाससभेतील पक्षनेते परेश धनानी यांनीही पदाचा राजीनामा दिला. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी पक्षाच्या विजयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. गुजरात हा भाजपच्या विकास आणि सुप्रशासनाच्या अजेंड्यासोबत असल्याचे या निकालावरून स्पष्ट झाल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. हा विश्वास दाखविल्याबद्दल मोदींनी गुजरातमधील जनतेचे आभारही मानले. 

Edited By Rajanand More
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com