नवी दिल्ली : देशभरात इंधन दरवाढीविरोधात सर्वच विरोधी पक्षांनी रान उठविले आहे. अनोख्या पध्दतीने दरवाढीचा निषेध केला जात आहे. शिवसेनेने आज चक्क स्कूटर पेटवून देत इंधन दरवाढीचा निषेध केला. तर काँग्रेसच्या नेत्यांनी रिक्षाला दोर बांधून ओढत नेले. काल काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी सिलेंडरवर बसून पत्रकार परिषद घेतली.
देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलचे तर शंभरवर पोहचले आहेत. डिझेल आणि गॅसचे दरही सातत्याने वाढत चालले आहेत. याविरोधात विरोधी पक्ष रस्त्यावर उतरले आहेत. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आज जम्मू काश्मीरमध्ये स्कूटर पेटवून देत इंधन दरवाढीचा निषेध केला. तर केरळमध्ये काँग्रेसने रिक्षाला दोरी बांधून रस्त्याने फिरविली. खासदार शशी थरूर यांच्यासह अनेक केरळ काँग्रेसचे अनेक पदाधिकारी यामध्ये सहभागी झाले होते.
#WATCH | Kerala: Shashi Tharoor, Congress MP from Thiruvananthapuram, and other party workers protest against fuel price rise, outside Kerala Secretariat pic.twitter.com/2F2pKTwNIh
— ANI (@ANI) February 26, 2021
राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी आज घरापासून मंत्रालयापर्यंत सायकलवर प्रवास करत इंधन दरवाढीचा निषेध केला. काल काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी सिलेंडरवर बसून पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी काल ई-स्कूटरवर कार्यालयात पोहचल्या. यावेळी त्यांनी इंधन दरवाढीविरोधातील फलक गळ्यात अडकवला होता. तसेच काही अंतर त्यांनी स्वत: स्कूटर चालविली.
Jammu and Kashmir: Shiv Sena leaders and workers protest and set a scooty on fire in Jammu, opposing the fuel price hike. pic.twitter.com/PBmPJXtNKq
— ANI (@ANI) February 26, 2021
अर्थमंत्र्यांनी केले हात वर
दरम्यान, केंद्र सरकारच्या मंत्र्यांकडून इंधन दरवाढीवर नियंत्रण आणणे केंद्र सरकारच्या हातात नसल्याचे म्हटले आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला आहे. यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहे. अनेक राज्यांत पेट्रोलच्या दराने शंभरचा टप्पा ओलांडला आहे. यावरुन केंद्रातील भाजप सरकारला विरोधकांकडून लक्ष्य करण्यात येऊ लागले आहे. इंधन दरवाढीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हात झटकले असून, सरकारच्या हातात काही नसल्याची भूमिका नुकतीच घेतली होती.
अनेक राज्यांत पेट्रोल प्रतिलिटर शंभर रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. मागील 12 दिवसांत पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 3.63 रुपये आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 3.84 रुपये वाढ झाली आहे. इंधन दरवाढीवरुन भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोधक लक्ष्य करीत आहेत. यातून दिलासा देणारे कोणतेही पाऊल अद्याप केंद्र सरकारने उचललेले नाही.
इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, पेट्रोलच्या वाढत्या दरावर सरकारने नियंत्रण ठेवावे की नाही, हा त्रासदायक मुद्दा आहे. यावर कोणतेही उत्तर दिले तरी ते पटण्यासारखे नाही. यावर सर्वांना पटणारे केवळ एकच उत्तर असून, ते म्हणजे दर कमी करणे. प्रत्यक्षात दराचा निर्णय तेल कंपन्या घेतात. यात सरकारचा कोणताही हस्तक्षेप नाही. सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरावरील नियंत्रण आधीच काढून टाकले आहे. यामुळे सरकारचे दरावर कोणतेही नियंत्रण नाही.
Edited By Rajanand More

