ग्लोबल गुपकरांची देशविरोधी भूमिका कॅांग्रेसला मान्य आहे का?  - Is Congress agrres the role of GUPKAR Group of J & K | Politics Marathi News - Sarkarnama

ग्लोबल गुपकरांची देशविरोधी भूमिका कॅांग्रेसला मान्य आहे का? 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020

जम्मू-काश्मीरच्या नेत्यांनी काढलेल्या गुपकर आघाडीची संभावना, भारताच्या अंतर्गत कारभारात जागतिक हस्तक्षेप हवा असलेली गॅंग  (टोळी) अशी संभावना करतानाच, कॅांग्रेसने त्यात सामील व्हायचे नेमके कारण काय, असा जोरदार हल्ला केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी चढविला आहे.

नवी दिल्ली :  जम्मू-काश्मीरच्या नेत्यांनी काढलेल्या गुपकर आघाडीची संभावना, भारताच्या अंतर्गत कारभारात जागतिक हस्तक्षेप हवा असलेली गॅंग  (टोळी) अशी संभावना करतानाच, कॅांग्रेसने त्यात सामील व्हायचे नेमके कारण काय, असा जोरदार हल्ला केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी चढविला आहे.

या अपवित्र गुपकर टोळीच्या असल्या  देशविरोधी कृत्यांना  कॅांग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी व राहूल गांधी यांचा पाठिंबा आहे का?, असाही तिखट सवाल त्यांनी विचारला आहे.

गुपकर गटाच्या जाहिरनाम्यात कॅांग्रेस समाविष्ट झाल्याने भडकलेल्या भाजपने आज चौफेर हल्ला चढवला. अमित शहा, केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद व अनेक मंत्र्यांनी कॅांग्रेसच्या या निणर्यावर टीकास्त्र सोडले.

जम्मू-काश्मीर कायम भारताचा अविभाज्य भाग राहिलेला आहे. गुपकर गट भारताच्या तिरंग्याचाही अपमान करतो. राष्ट्रहिताच्या विरोधात बनलेल्या अशा कोणत्याही अपवित्र गॅंगला भारतीय जनता सहन करणार नाही. गुपकर टोळीने देशाचा कल ओळखून वागले नाही, तर लोक या टोळीलाच बुडवतील, अशीही शापवाणी शहा यांनी वर्तविली आहे.   

आतापावेतो या गटापासून दूर असलेल्या कॅांग्रेसने देखील त्यात सहभागी होण्याचे ठरवल्यावर भाजपने हा जोरदार हल्ला बोल केला आहे. श्री. शहा यांनी एकामागोमाग ट्विट करत म्हटले, की गुपकर टोळी आता जागतिक (ग्लोबल) होते आहे. भारताचे अविभाज्य अंग असलेल्या जम्मू-काश्मीर प्रश्नी आंतरराष्ट्रीय शक्तींनी हस्तक्षेप करावा, अशी या टोळीची इच्छा आहे. सोनियाजी व राहूल गुपकरांच्या या हालचालींना पाठिंबा देतात का?, याबाबत त्यांनी देशासमोर भूमिका स्पष्ट करायला पाहिजे.

शहा पुढे  म्हणतात, की कॅांग्रेस व गुपकर टोळी जम्मू काश्मीरला पुन्हा दहशतवादाच्या अंधार युगात घेऊन जाऊ इच्छितात. कलम ३७० हटवून आम्ही त्या राज्यातील दलित, आदिवासी व महिलांना जे अधिकार मिळवून दिले, ते पुन्हा हिसकावून घेण्याचे या टोळीचे कॅांग्रेसचे षडयंत्र आहे. देशाची जनता कॅांग्रेससह या सर्वांना प्रत्येक जागी झिडकारते आहे.

हा गुपकर गट जम्मू-काशमीरमध्ये पुन्हा कलम ३७० व ३५ अ लागू करावे, ही मुख्य मागणी करत आहे. भारत सरकारने  मागच्या वर्षी ही कलमे संपुष्टात आणल्यावर सुमारे आठ महिने नजरकैदेत पडलेल्या मेहबूबा मुफ्ती व अब्दुल्ला पितापुत्रांनी मुक्तता झाल्यावर लगेचच या गटाची स्थापना करून चीन व इतरांची मदत मागितली. मुफ्ती यांनी तर, काश्मिरी झेंडा वगळता दुसरा झंडा हाती घेणार नाही अशी मुक्ताफळे उधळली व सतत भडक वक्तव्ये सुरू ठेवली आहे .   
...
काय आहे गुपकर? 
नॅशनल कॉन्फ्रन्सचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला व त्यांचे पुत्र उमर अब्दुल्ला यांच्या श्रीनगरातील गुपकर भागातील निवासस्थानी गुपकर गटाची स्थापना अलीकडे करण्यात आली. पीडीपी नेत्या मेहबूबा मुफती व अन्य स्थानिक पक्षनेते या गटात आहेत. या गटाने ४ आॅगस्ट २०१९ रोजी सर्वपक्षीय बैठक घेऊन एक घोषणापत्र जारी केले. त्यात कलम ३७० व ३५ अ पुन्हा लागू करण्याची जोरदार मागणी करण्यात आली होती. जम्मू-काश्मीरची वेगळी ओळख, स्वायत्तता व त्याचा विशेष  दर्जा यांचे संरक्षण करण्यासाठी गुपकर गट एकत्रितपणे प्रयत्नशील राहील असे त्यात नमूद करण्यात आले होते.
...
 

https://developers.facebook.com/docs/plugins/embedded-posts/?prefill_hre...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख