ज्योतिरादित्य शिंदे, शिवराजसिंह यांच्यात मंत्रिपदावरून रस्सीखेच 

मध्य प्रदेशातील शिवराजसिंह चौहान सरकारचा बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर आता बड्या खात्यासाठी खासदार ज्योतिरादित्य शिंदे आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. मुख्यमंत्री चौहान यांनी या संदर्भात दिल्लीतील पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्त्वाकडे मार्गदर्शन मागितले आहे.
Competition between Jyotiraditya Shinde and Shivraj Singh for big ministry in Madhya Pradesh
Competition between Jyotiraditya Shinde and Shivraj Singh for big ministry in Madhya Pradesh

भोपाळ : मध्य प्रदेशातील शिवराजसिंह चौहान सरकारचा बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर आता बड्या खात्यासाठी खासदार ज्योतिरादित्य शिंदे आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. मुख्यमंत्री चौहान यांनी या संदर्भात दिल्लीतील पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्त्वाकडे मार्गदर्शन मागितले आहे. 

मुख्यमंत्री चौहान यांनी एक जुलै रोजी एका ट्‌विटमध्ये म्हटले होते की, "जेव्हा समुद्र मंथन होते, त्यावेळी शंकराला विष प्राशन करावे लागले होते.' हे ट्‌विट त्यांनी मंत्रिमंडळाच्या बहुप्रतिक्षित विस्ताराच्या एक दिवस आधी केले होते. त्यातून त्यांना ज्योतिरादित्य शिंदे यांच्या मागण्यांसमोर तडजोड करावी लागत असल्याची मजुबरी दिसून येत आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या चार दिवसांनंतरही 28 नव्या मंत्र्यांना विभागाचे वाटप न होणे म्हणजे मुख्यमंत्री कोंडीत सापडल्याचे दिसून येत आहे. यातून मूळचे भाजपचे आणि कॉंग्रेस सोडून भाजपमध्ये आलेल्या आमदारांमध्ये खाते वाटपावरून रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येत आहे. 

भाजपच्या वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री चौहान आपल्या विश्‍वासू सहकाऱ्यांकडे गृह, आरोग्य, अर्थमंत्री, जलसंपदा, परिवहन आणि जनसंपर्क या सारखे विभाग देण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र, यातील बरीच खाती आपल्या विश्‍वासू आमदारांना मिळावीत, यासाठी ज्योतिरादित्य शिंदे जोर लावत आहेत. 

मागील कॉंग्रेसच्या कमलनाथ सरकारमध्ये शिंदे यांच्या समर्थक आमदारांकडे आरोग्य, वाहतूक, महिला आणि बालविकास तसेच शालेय शिक्षण ही खाती होती. ही सर्व खाती त्यांच्या निष्ठावंतांना मिळावीत, अशी मागणी शिंदे यांनी केल्याची माहिती आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री चौहान यांनी भाजपचे ताकदवान नेते नरोत्तम मिश्रा यांच्याकडे अगोदरच काही खाती सोपवली आहेत. याशिवाय मिश्रा यांच्यासमवेत गोपाळ भार्गव आणि विजय शहा या व त्यांच्यासारख्या इतर ज्येष्ठ नेत्यांना महत्त्वाची खाती द्यावी लागणार आहेत. 

भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत खातेवाटपाच्या मुद्यावरून विचारमंथन सुरू आहे. शिवराजसिंह चौहान रविवारी पक्षाच्या प्रमुख नेत्यांना भेटण्यासाठी दिल्लीत होते. वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून त्यांनी त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. 

दिल्लीतील पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाने चौहान यांना शिंदे यांचे मध्य प्रदेशमधील महत्त्व पटवून दिले आहे. केवळ कमलनाथ सरकार पाडण्यात आणि चौहान सरकार उभारण्यात शिंदे यांचा हात होता असे नाही, तर भविष्यात मध्य प्रदेश आणि भाजपच्या राजकारणात त्यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे, असे त्यांनी सांगण्यात आले आहे. 

कमलनाथ सरकार पाडण्यासाठी ज्या 22 बंडखोरांनी विधानसभा सदस्यत्व सोडले आहे. त्यांना पुन्हा निवडणूक लढवायची आहे. त्यांना निवडून आणून शिंदे हे भाजपमध्ये आपली ताकद राखण्याचा प्रयत्न नक्कीच करतील. 

दुसरीकडे, विरोधी पक्ष कॉंग्रेसने सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले आहे की, मंत्र्यांच्या यादीनंतर आता खातेवाटपही दिल्लीत ठरविण्यात येत आहे. श्रीमंतांच्या सोबत सहप्रवासी होणे सोपे असणार नाही. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com