उत्तर प्रदेशात भाजपमध्ये दुफळी! योगी थेट मोदींच्या भेटीला - CM Yogi Adityanath will meet PM Narendra Modi and Amit Shah in Delhi | Politics Marathi News - Sarkarnama

उत्तर प्रदेशात भाजपमध्ये दुफळी! योगी थेट मोदींच्या भेटीला

वृत्तसंस्था
गुरुवार, 10 जून 2021

पुढील वर्षी उत्तरप्रदेशात विधासनभेच्या निवडणुका होणार आहेत.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात कोरोनातील (Covid-19) परिस्थिती हाताळण्यात आलेले अपयश तसेच काही नेत्यांच्या नाराजीमुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात रोढ वाढत असल्याची चर्चा आहे. त्यानंतर उत्तर प्रदेशात मागील आठवडाभरात राजकीय घडामोडींना वेग आला होता. त्यातच आता योगी आज दिल्लीला रवाना झाले असल्याने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. (CM Yogi Adityanath will meet PM Narendra Modi and Amit Shah in Delhi)

पुढील वर्षी उत्तरप्रदेशातील विधासनभेच्या निवडणुका होणार आहेत. काँग्रेसमधील बडे नेते जितिन प्रसाद यांनी कालच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी योगी आदित्यनाथ दिल्लीत दाखल झाले आहेत. आज दिल्लीत ते गृहमंत्री अमित शहा व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेणार आहेत. तर शुक्रवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही ते भेटणार आहेत. भाजपमध्ये दुफळी निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. काही आमदारांनी उघडपणे सरकारबद्दल रोष व्यक्त केला आहे. 

हेही वाचा : महाराष्ट्र कधी झुकला नाही, झुकणार नाही! अजित पवारांचा रोख कुणाकडे?

योगींचं रिपोर्ट कार्ड मोदींना आधीच पोहचले

काही दिवसांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय महामंत्री बी.एल. संतोष यांनी लखनऊ येथे योगी सरकारमधील काही मंत्र्यांची गुप्त बैठक घेतली होती. त्यांच्याकडून उत्तरप्रदेशातील भाजपच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला होता. कोरोनाची स्थिती हाताळण्यात योगींना अपयश आल्याचा ठपका भाजपमधील नेत्यांनी ठेवला होता. याबाबतच्या तक्रारी केंद्रीय नेतृत्वाकडेही गेल्या होत्या. नड्डा यांच्याकडे बैठकीला अहवाल देण्यात आला होता. त्यानंतर हा अहवाल पंतप्रधान मोदींकडेही सुपूर्द करण्यात आला आहे. त्यामुळे योगींचे रिपोर्ट कार्ड त्यांना भेटण्याच्या आधीच मोदींकडे पोहचले आहे. 

योगींसमोर आव्हान

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत उत्तर प्रदेशातील स्थिती आवाक्याबाहेर गेली होती. रुग्णांना रुग्णालयात बेड मिळत नव्हते. ऑक्सिजनचा तुटवडाही मोठ्या प्रमाणावर जाणवला. मृतदेहांचे दहन करण्यासही जागा नसल्याने अनेक मृतदेह गंगा नदीच्या किनारी पुरण्यात आले होते. तर शेकडो मृतदेह गंगा नदीच्या प्रवाहात सोडण्यात आले होते. हा प्रकार समोर आल्यानंतर योगी सरकारला टीकेला सामोरे जावे लागले होते. भाजपमधील नेत्यांनी यावर नाराजी व्यक्त केली होती. पुढील निवडणुकीपूर्वी योगींना आपली प्रतिमा सुधारण्याचे आव्हान असणार आहे. त्यासाठी दिल्लीत भेटीत केंद्र सरकारकडे मदतीची मागणी केली जाऊ शकते. 

मंत्रीमंडळ विस्ताराची शक्यता 

उत्तर प्रदेशातील अनेक आमदार सध्या नाराज आहेत. त्यांना मंत्रीमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. त्यासाठी लवकरच मंत्रीमंडळ विस्तार होऊ शकतो. त्यादृष्टीने दिल्ली भेटीत चर्चा केली जाणार असल्याचे समजते. निवडणुकीसाठी काही महिने उरले आहेत. एवढ्या कमी कालावधीसाठी मंत्रीमंडळ विस्तार करून भाजपकडून आमदारांची नाराजी दूर केली जाणार आहे. तसेच विविध महामंडळे, समित्या, संघटनांवरील नियुक्त्याही तातडीने केल्या जाऊ शकतात. त्यामुळे योगींची दिल्लीवारी विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्यादृष्टीने महत्वाची मानली जात आहे. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख