कोलकता : पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी भाजप व तृणमूल काँग्रेसकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिल्लीत झालेल्या हिंसाचारावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांचा 'अमित भैय्या' असा उल्लेख करून ''आधी दिल्ली सांभाळा मग पश्चिम बंगालचा विचार करा'', असा टोला लगावला आहे.
कृषी कायद्यांविरोधात पश्चिम बंगालच्या विधानसभेत प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावावरील चर्चेदरम्यान ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर टीका केली. त्या म्हणाल्या, ''दिल्लीतील परिस्थिती पोलिसांना हाताळती आली नाही. अशी घटना बंगालमध्ये घडली असती तर अमित भैय्या म्हणाले असते, 'काय झाले?' आम्ही या घटनेची निंदा करतो. तिन्ही कायदे रद्द केले पाहिजेत. कायदे परत घ्या किंवा खुर्ची सोडा.''
Police could not tackle the situation in Delhi. If it would have Bengal then Amit bhaiya would have said, "kya hua?" We strongly condemn it. We want these three laws to be repealed. Either you withdraw the laws or leave the chair: West Bengal CM Mamata Banerjee at the Assembly
— ANI (@ANI) January 28, 2021
आम्ही शेतकऱ्यांसोबत असल्याचे सांगत ममता बॅनर्जी म्हणाल्या, कृषी कायदे जबरदस्तीने संमत करण्यात आले आहेत. मोदी सरकारने चुकीच्या पध्दतीने दिल्लीतील आंदोलन हातळले आहे. तिथे जे काही झाले त्याला पुर्णपणे भाजपच जबाबदार आहे. आधी दिल्लीला सांभाळा, मग बंगालचा विचार करा, अशा शब्दांत त्यांनी भाजपला आव्हान दिले.
काँग्रेसकडून दिल्लीतील हिंसेवरून भाजपला जबाबदार धरले आहे. लाल किल्ल्यामध्ये घुसलेले आंदोलक भाजपचे एजंट होते. याला अमित शहा जबाबदार असून त्यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनी केली आहे. काँग्रेसच्या या आरोपांना प्रत्युतर देताना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पलटवार केला आहे. या घटनेला त्यांना काँग्रेसलाच जबाबदार धरले आहे.
शेतकऱ्यांनो परत जा; दिल्लीत स्थानिक उतरले रस्त्यावर...
प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर मोर्चादरम्यान दिल्लीत झालेल्या हिंसाचारानंतर आता स्थानिक नागरिक शेतकऱ्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. आज अनेक स्थानिकांनी शेतकरी आंदोलन सुरू असलेल्या सिंघू सीमेवर जमा होत आंदोलनाविरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे सीमेवर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दिल्लीत बुधवारी मोर्चादरम्यान अनेक भागात हिंसाचार उफाळून आला. पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड, पोलिसांना मारहाण, त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याच्या घटना घडल्या. तसेच लाल किल्ल्यावर शेतकरी संघटनाचा ध्वज फडकावण्यात आला. पोलिसांनीही लाठीमार व अश्रृधुराच्या नळकांड्या फोडून आंदोलकांना पांगविण्याचा प्रयत्न केला. या हिंसाचारानंतर दिल्लीतील स्थिती आज पुर्ववत झाली आहे. तसेच शेतकरीही सुमारे दोन महिने सुरू असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी गेले आहेत.
Edited By Rajanand More

