मोठी बातमी : काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या वडिलांना पोलिसांनी केली अटक

लखनऊ येथे एका आंदोलनादरम्यान त्यांनी ब्राम्हण समाजाविषयी वादग्रस्त टिप्पणी केली होती.
CM Bhupesh Baghels father Nand Kumar Baghel arrested
CM Bhupesh Baghels father Nand Kumar Baghel arrested

रायपूर : छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांचे वडील नंद कुमार बघेल (Nand Kumar Baghel) यांना रायपूर पोलिसांनी अटक केली आहे. उत्तर प्रदेशात ब्राम्हण समाजाविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुख्यमंत्र्यांनीही वडिलांना कायदेशीर कारवाई सामोरे जावे लागेल, असे संकेत दिले होते. (Chhattisgarh CM Bhupesh Baghel's father Nand Kumar Baghel arrested)

छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता असून भूपेश बघेल मुख्यमंत्री आहेत. त्यांना त्यांच्या वडिलांनीच अडचणीत आणलं आहे. लखनऊ येथे एका आंदोलनादरम्यान त्यांनी ब्राम्हण समाजाविषयी वादग्रस्त टिप्पणी केली होती. त्यानंतर राज्यात त्यांच्याविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. तसेच अनेक भाजप नेत्यांनीही थेट मुख्यमंत्री व काँग्रेसवर निशाणा साधाला. पुढील वर्षी उत्तर प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. यापाश्वर्भूमीवर हे वक्तव्य काँग्रेसला महागात पडू शकते, असं मानलं जात आहे. 

त्यानंतर रविवारी नंद कुमार बघेल यांच्याविरोधात रायपूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर माध्यमांशी बोलताना बघेल यांनी वडिलांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, कायद्यापेक्षा कुणीही मोठे नाही, मग ते माझे 86 वर्षांचे वडील असले तरी. छत्तीसगड सरकार सर्व जाती-धर्माचा, समाजाचा अन् त्यांच्या भावनांचा आदर करते. माझ्या वडिलांनी एका विशिष्ट समाजाबद्दल केलेल्या वक्तव्याने सामाजिक सलोखा बिघडला आहे. या वक्तव्यानं मीही निराश झालो आहे, असं मुख्यमंत्री बघेल यांनी सांगितलं. यानंतर दोन दिवसांतच वडिलांना दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. 

आम्हा दोघांचे राजकीय विचार खूपच वेगळे आहेत. मी मुलगा म्हणून त्यांचा नेहमीच आदर करतो. पण मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या चुकीवर पदडा टाकणार नाही. त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई होईल, असंही बघेल यांनी स्पष्ट केलं आहे. नंद कुमार बघेल यांच्या वक्तव्यावरून समाजाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. 

त्यांच्याविरोधात छत्तीसगढमध्ये आंदोलनही करण्यात आले. त्यानंतर रायपूरमधील डीडी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री व त्यांच्या वडिलांमध्ये सुरूवातीपासूनच वैचारिक मतभेद असल्याची चर्चाही छत्तीसगडमध्ये आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com