युपीच्या राजकारणात खळबळ : मोदींसोबत वीस वर्षे राहिलेला IAS अधिकारी आमदार होणार - Close confident officer of PM modi set to become MLC in UP | Politics Marathi News - Sarkarnama

युपीच्या राजकारणात खळबळ : मोदींसोबत वीस वर्षे राहिलेला IAS अधिकारी आमदार होणार

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 15 जानेवारी 2021

अरविंद कुमार शर्मा यांनी 2001 ते 2020 या कालावधीत नरेंद्र मोदी यांच्यासोबत अधिकारी म्हणून काम केले आहे.

नवी दिल्‍ली : उत्तरप्रदेशात विधान परिषदेच्या 12 जागांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय, माजी सनदी अधिकारी अरविंद कुमार शर्मा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे.

शर्मा यांनी प्रशासकीय सेवेतून दोन दिवसांपूर्वीच स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. त्यानंतर लगेचच शर्मा यांनी काल भाजपमध्ये प्रवेश केला. तातडीने भाजपच्या केंद्रीय समितीने आज शर्मा यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले.  

अरविंद कुमार शर्मा यांनी 2001 ते 2020 या कालावधीत नरेंद्र मोदी यांच्यासोबत सहयोगी अधिकारी म्हणून काम केले आहे. शर्मा हे गुजरात मुख्यमंत्री कार्यालय आणि पंतप्रधान कार्यालयातही कार्यरत होते. त्यांनी दोन वर्ष अगोदरच स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे.

विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर शर्मा यांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमध्ये महत्वाची जबाबदारी देण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. शर्मा हे उत्तरप्रदेश येथील मऊ जिल्ह्यातील रहिवासी असून नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय समजले जाते. गुजरातमध्ये `व्हायब्रंट गुजरात` या योजनेद्वारे मोठी गुंतवणूक आणणारी योजना शर्मा यांनी राबवली होती. मोदी हे पंतप्रधान म्हणून दिल्लीत आल्यानंतर शर्मा हे पंतप्रधान कार्यालयात आले. कोरोना काळात अडचणीत गेलेल्या सूक्ष्म व लघु उद्योगांसाठी मोठ्या योजना मोदी सरकारने राबवल्या. त्या काळात या खात्याचे सचिवपद शर्मा यांना देण्यात आले. शर्मा यांना उत्तर प्रदेशच्या राजकारणात पाठविण्याचे अनेक अर्थ लावले जात आहे. ते मंत्री किंवा उपमुख्यमंत्री देखील होऊ शकतात. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना स्पर्धक म्हणून तर शर्मा यांना पाठविले गेले नाही ना, अशीही शंका व्यक्त होत आहे. 

 
भाजपचे महासचिव अरूण सिंह यांनी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा, प्रदेश भाजपचे अध्यक्ष स्वतंत्र देव, ज्येष्ठ नेता लक्ष्मण प्रसाद आचार्य यांना भाजपने पुन्हा उमेदवारी दिली आहे. उत्तरप्रदेशात विधान परिषदेच्या 12 जागांसाठी ता. 28 जानेवारी निवडणुक होत आहे. अर्ज भरण्याची मुदत 18 जानेवारी आहे. ज्या बारा जागांसाठी ही निवडणूक होत आहे, त्याचा कार्यकाळ 30 जानेवारी रोजी संपत आहे. अपना दल (सोनेलाल) सोबत भाजपची युती आहे. 
  
शंभर सदस्य असलेल्या उत्तर प्रदेश विधान परिषदेत समाजवादी पार्टी 55, भाजप 25, बहुजन समाज पार्टी 8, काँग्रेस आणि अपक्ष प्रत्येकी दोन, अपना दल (सोनेलाल) आणि शिक्षक दल यांचे प्रत्येकी एक सदस्य आहेत. या व्यक्तीरिक्त तीन अपक्ष सदस्य आहेत.

उत्‍तर प्रदेश विधानसभेची सदस्य संख्या 403 आहेत. यात सध्या 402 सदस्य आहेत. (भाजप 310, सपा 49, बसपा 18, अपना दल (सोनेलाल) 9, काँग्रेस 7, सुहेलदेव भारतीय समाज पार्टी 4, अपक्ष 3, राष्ट्रीय लोकदल 1, निर्बल इंडियन शोषित हमारा दल(निषाद) 1)

हेही वाचा : 41 आमदार भाजपच्या संपर्कात : या नेत्याचा दावा
कोलकत्ता : यंदाच्या निवडणुकीत भाजपाने तृणमूलसमोर कडवे आव्हान उभे केले आहे. तृणमूलच्या अनेक बड्या नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. तृणमूलचे दिग्गज नेते शुभेंदु अधिकारी यांनी राजीनामा दिल्यावर ममता बॅनर्जींच्या गोटात भूकंप झाला होता. त्यानंतर आता तृणमूलचे ४१ आमदार भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहेत. तृणमूलमधील अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी स्वत:हून राजीनामे देण्यास सुरूवात केली आहे.तृणमूलकडून त्यांना मिळालेली पदे ते सोडत आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर नाराज असलेल्या ४१ आमदारांनी भाजपामध्ये सामील होण्याची तयारी दर्शविली आहे, अशी माहिती भाजपाचे राष्ट्रीय महासचिव कैलास विजयवर्गीय यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख