" नितीशकुमारमुक्त" सरकार बनविणार : चिराग पासवान - Chirag Paswan said Nitish Kumar will not become the Chief Minister again We will form a BJP LJP government. | Politics Marathi News - Sarkarnama

" नितीशकुमारमुक्त" सरकार बनविणार : चिराग पासवान

सरकारनामा ब्युरो
रविवार, 25 ऑक्टोबर 2020

"बिहार विधानसभा निवडणुकीत लोजपा आणि भाजपच्या उमेदवारांना निवडून द्या. येणारं सरकार हे नितीशमुक्त सरकार बनवूया."

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर लोकजनशक्ती पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान यांनी टीका केली आहे. याबाबत त्यांनी टि्वट केलं आहे. ते आपल्या टि्वटमध्ये म्हणतात "बिहार विधानसभा निवडणुकीत लोजपा आणि भाजपच्या उमेदवारांना निवडून द्या. येणारं सरकार हे नीतीशमुक्त सरकार बनवूया."

चिराग पासवान यांनी आज सीतामढी येथे माता सीता यांच्या जन्मस्थळाला भेट दिली. तेथे त्यांनी पूजा केली. सीतामढी येथे माता सीता यांचे मंदीर बनविणार असल्याच चिराग पासवान यांनी सांगितले. अयोध्या येथे राम मंदीर उभारले जात आहे. असेच माता सीता यांचे मंदीर सीतामढी येथे बांधण्यात येणार आहे. जागतिक स्तरावर एक पर्यटन स्थळ म्हणून हा परिसर विकसित करण्यात येणार आहे. आम्ही सत्तेत आल्यावर या मंदीराचे भूमिपूजन लवकरच करण्यात येईल, असे चिराग पासवान यांनी सांगितले. 

निवडणुकीनंतर आपले सरकार येणार का याबाबत एएनआईशी बोलताना चिराग पासवान म्हणाले की नक्कीत आमचे सरकार येईल. कमीत कमी आज जे मुख्यमंत्री आहेत ते पु्न्हा मुख्यमंत्री बनणार नाही. आम्ही भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली भाजप-लोजपाचे सरकार बनवू.

बिहारमध्ये प्रचाराला आता जोर चढला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे थेट मैदानात उतरले आहेत. मोदींनी जाहीर सभेत बोलताना दिवंगत सहकारी रामविलास पासवान  यांच्या आठवणी जागवून जनभावनेला हात घातला होता. मात्र, पासवान यांचे पुत्र चिराग यांच्याबाबत मोदींनी सूचक मौन पाळले आहे. आगामी सत्तासमीकरणे डोळ्यासमोर ठेवून मोदींना ही खेळी खेळल्याची चर्चा सुरू आहे. एनडीएपासून फारकत घेणाऱ्या चिराग यांच्यामुळे भाजपचा सहकारी पक्ष असलेल्या संयुक्त जनला दलातील अस्वस्थता मात्र, वाढली आहे. 

मुख्यमंत्री नितीशकुमार यांना विरोध करीत बिहारमधील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) लोक जनशक्ती पक्ष (एलजेपी) बाहेर पडला आहे. याचवेळी देश पातळीवर भाजपला पाठिंबा कायम राहील, अशी भूमिका एलजेपीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी घेतली आहे. चिराग यांनी हे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि त्यांच्या संयुक्त जनता दलाला (जेडीयू) लक्ष्य करीत आहेत. चिराग पासवान हे स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवून घेत आहेत. अखेरच्या श्वासापर्यंत मोदींसोबत राहू, असे चिराग जाहीरपणे बोलत आहेत.  

मोदींनी रामविलास पासवान यांचा उल्लेख केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. चिराग पासवान हे एनडीएमधून बाहेर पडले असले तरी ते मोदींचे गुणगाण गाताना थकत नसल्याचे चित्र आहे. याचवेळी मोदींनीही चिराग यांचे पिता रामविलास पासवान यांच्या आठवणी जागवल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहे. पासवान यांच्या निधनानंतर जनतेत असलेल्या सहानुभूतीच्या लाटेचा फायदा व्हावा, असा उद्देश यामागे असल्याची चर्चा  सुरू झाली आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख