अन् सरन्यायाधीश पोहचले पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरी - Chief Justice at PM Modis house to select next CBI Director | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

अन् सरन्यायाधीश पोहचले पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरी

वृत्तसंस्था
सोमवार, 24 मे 2021

लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधिर रंजन चौधरी हेही पंतप्रधानांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.

नवी दिल्ली : देशाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा (CJI N. V. Ramana) काही वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या निवासस्थानी पोहचले आहेत. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील एका समितीची बैठक होणार आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधिर रंजन चौधरी या समितीमध्ये असून तेही पंतप्रधानांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. (Chief Justice at PM Modis house to select next CBI Director)

केंद्रीय अन्वेषण (CBI) विभागाच्या संचालकांची निवड या बैठकीत केली जाणार आहे. समितीमध्ये सुमारे १०० वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या नावावर चर्चा केली जाणार आहे. हे अधिकारी १९८४ ते १८८७ च्या तुकडीतील आहेत. नवीन सीबीआय संचालकांच्या निवडीला जवळपास चार महिन्यांचा विलंब झाला आहे. अखेर आज पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत आहे. 

कोण होऊ शकतात सीबीआयचे संचालक?

आसाम-मेघालय केडरचे १९८४ तुकडीचे आयपीएस अधिकारी वाय. सी. मोदी यांचे नाव चर्चेत आहे. ते राष्ट्रीय तपास यंत्रणेचे महासंचालक आहेत. सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक व गुजरात केडरचे अधिकारी असलेले राकेश अस्थाना आणि इंडो-तिबेटियन बॅार्डर पोलिसचे महासंचालक एस. एस. देसवाल यांचीही नावे चर्चेत आहेत. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशचे पोलिस महासंचालक एच. सी. अवस्थी, केरळचे महासंचालक लोकनाथ बहेरा, रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालक अरूण कुमार आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे महासंचालक एस. के. जैसवाल यांच्या नावावर विचार होण्याची शक्यता आहे.  

हेही वाचा : पालकांनो घाबरू नका; मुलांना कोरोनाच्या संसर्गावर एम्सच्या संचालकांनी दिली महत्वाची माहिती

सीबीआय संचालकांची निवड सर्वात वरिष्ठ, अनुभव व निष्ठा याआधारे केली जाते. तसेच भ्रष्टाचारविरोधी प्रकरणांच्या तपासातील त्यांचा अनुभवही महत्वाचा असतो. १९८४ ते १९८७ च्या तुकडीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या यादीतील १०० अधिकाऱ्यांचा त्यासाठी विचार केला जाईल. या चाळणीतून सीबीआयच्या पुढील संचालकांची निवड केली जाईल. पदावर निवड झाल्यानंतर ते अधिकारी किमान दोन वर्षे संचालक म्हणून काम करू शकतात. 

दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर आर. के. शुक्ला हे फेब्रुवारी महिन्यात सीबीआयच्या संचालक पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यानंतर सीबीआयचे वरिष्ठ अतिरिक्त संचालक प्रविण सिन्हा यांच्यावर संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. नवीन पुर्णवेळ संचालकांची निवड झाल्यानंतर त्यांच्याकडे पदभार सोपवला जाईल. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख