पाकिस्तानच्या संसदेत धुमश्चक्री; खासदारांना मारहाण अन् शिवीगाळ - Chaos breaks out in pakistan assembly over budget | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

पाकिस्तानच्या संसदेत धुमश्चक्री; खासदारांना मारहाण अन् शिवीगाळ

वृत्तसंस्था
बुधवार, 16 जून 2021

आक्रमक झालेल्या खासदारांना थांबवणे सुरक्षारक्षकांनाही शक्य झाले नाही.

इस्लामाबाद : पाकिस्तान संसदेत मंगळवारी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली. अर्थसंकल्पावरून चर्चा सुरू झाल्यानंतर एकच गदारोळ निर्माण झाला. एकमेकांना शिवीगाळ करत अर्थसंकल्पाच्या प्रती अंगावर फेकण्यात आल्या. काही मारहाण झाल्याचा दावाही करण्यात आला आहे. त्यामुळं पाकिस्तान संसदेला मंगळवारी आखाड्याचे स्वरूप आले होते. (Chaos breaks out in Pakistan assembly over budget)

पाकिस्तान संसदेमध्ये काही दिवसांपूर्वी अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. मंगळवारी अर्थसंकल्पावर चर्चा सुरू होती. पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाज (PML-N) चे अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते शाहबाज शरीफ हे बोलत होते. याचवेळी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या पक्षाचे नेते अली अवान यांनी बोलण्यात अडथळे आणले. तसेच विरोधी पक्षाच्या एका खासदाराला शिवीगाळही केली. अर्थसंकल्पाची एक प्रतही त्यांनी खासदाराच्या दिशेने फेकली. त्यानंतर संसदेत अभूतपुर्व गोंधळाला सुरूवात झाली. 

हेही वाचा : मराठा आरक्षणाबाबत पंतप्रधानांचे विचार काय आहेत?

सत्ताधारी व विरोधी पक्षातील खासदारांनी एकमेकांच्या अंगावर अर्थसंकल्पाच्या प्रती फेकण्यास सुरूवात केली. तसेच अनेकांनी शिवीगाळही केली. तसेच हातात मिळेल त्या वस्तू विरोधी खासदारांच्या अंगावर फेकल्या जात होत्या. त्यामुळे संसदेचे सभागृहाचा जणू आखाडा बनला. काही खासदार एकमेकांच्या अंगावर धावून जात मारहाणीचा प्रयत्नही केला. सुरक्षा रक्षकांनी दोन्ही बाजूकडील खासदारांना आवरण्याचा प्रयत्न केला. पण आक्रमक झालेल्या खासदारांना थांबवणे त्यांनाही शक्य झाले नाही.

सभागृहामध्ये यावेळी महिला खासदारही मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. एका महिला खासदाराच्या डोळ्याला दुखापतही झाली. तर काही सुरक्षारक्षक आणि खासदारांनाही दुखापत झाल्याचे सांगितले जात आहे. मंगळवारी झालेल्या या प्रकारानंतर खासदार मरियम औरंगजेब यांनी इम्रान खान यांच्यावर जोरदार टीका केली. ही इम्रान खान यांनी बनविलेल्या नवीन पाकिस्तानची स्थिती आहे. इम्रान खान संसदेला मोडकळीस आणण्यात आणि लोकशाही कमजोर करण्यात कोणतीच कसर सोडत नाहीत. 

शरीफ यांनीही या प्रकाराला इम्रान खानच जबाबदार असल्याचे म्हटले आहे. इम्रान खान यांनी एक कोटी नोकऱ्यांचे आश्वासन दिले होते. पण कुठे आहेत नोकऱ्या? देशात भ्रष्टाचार बोकाळला आहे. नियुक्ती आणि बदल्यांसाठी कोणताही कायदा नाही. भ्रष्टाचाराशिवाय ही कामंच होत नाहीत, असा आरोप शाहबाज यांनी केला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख