BREAKING : भारतात रशियाच्या लशीच्या वापराला परवानगी - Cetral Government approves emergency use authorisation to Sputnik V | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

BREAKING : भारतात रशियाच्या लशीच्या वापराला परवानगी

वृत्तसंस्था
सोमवार, 12 एप्रिल 2021

स्पुटनिकचे उत्पादन डॉ. रेड्डीज ही भारतीय कंपनी करीत आहे.

नवी दिल्ली : भारतातील कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या मोहिमेला मोठे बळ मिळणार आहे. लवकरच भारतात तिसरी लसही उपलब्ध होणार आहे. रशियाच्या स्फुटनिक या लशीच्या वापरासाठी केंद्रीय मंत्रालयाने हिरवा कंदील दाखवला आहे. आपत्कालीन वापरासाठी ही परवानगी मिळाल्याने लसीकरणाचा वेग वाढणार आहे.

देशात 1 एप्रिलपासून कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू होत असून, यात 45 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस देण्यास सुरवात होत आहे. देशात सध्या कोरोनाच्या दोन लशी वापरात असून, लवकरच तिसरी लसही उपलब्ध होण्याची शक्यता आहे. रशियाची स्पुटनिक व्ही लशीला देशात वापराची परवानगी देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यावर आज शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. मर्यादीत स्वरूपात या लशीचा वापर करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. ही लस 92 टक्के परिणामकारक असल्याचा दावा कंपनीने केला आहे. 

स्पुटनिकचे उत्पादन डॉ. रेड्डीज ही भारतीय कंपनी करीत आहे. या कंपनीने लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचा अहवाल सरकारकडे सादर केला आहे. यावर केंद्रीय औषध नियामक संघटनेच्या (सीडीएससीओ) तज्ज्ञ समितीची बैठक झाली. या बैठकीत लशीच्या वापराबाबत निर्णय झाला. डॉ.रेड्डीजने मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडशी भागीदारी केली. यातून स्पुटनिक व्ही या लशीच्या भारतात चाचण्या आणि वितरण याचे अधिकार डॉ.रेड्डीज कंपनीला मिळाले आहेत. ही लस रशियाचे आरोग्य मंत्रालयाने विकसित केली असून, तिचे भारतात उत्पादन डॉ. रेड्डीज कंपनी करीत आहेत.  

भारतात सध्या दोन लशींचा वापर

भारतात सध्या सिरम इन्स्टिट्युटच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या दोन लशींचा वापर सुरू आहे. मात्र, मागील काही दिवसांत लसीकरणाचा वेग वाढल्याने देशातील अनेक भागात लशीचा तुटवडा जाणवत आहे. अपेक्षित लस मिळत नसल्याने लसीकरण केंद्र बंद ठेवावी लागत आहेत. त्यातच आता स्पुटनिक लशीला परवानगी मिळाल्याने लशीच्या पुरवठ्याची समस्या दूर होण्याची शक्यता आहे. मात्र, ही लस प्रत्यक्षात कधी उपलब्ध होणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

पुढील सात महिन्यात चार लशी

पुढील सात महिन्यांमध्ये देशात आणखी चार लशींना मान्यता मिळू शकते. त्यामध्ये जॅान्सन अँड जॅान्सन, सिरम इन्स्टिट्युट, झायडस कॅडिला आणि भारत बायोटेक या कंपन्यांच्या लशीचा समावेश आहे. यातील सिरम व बायोटेकची लस नाकावाटे देण्यात येणारी आहे. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख