दिल्लीतील कोरोना रोखण्यासाठी अमित शहांचे मंत्रालय सरसावले - Central Home Ministry to Handle Coroan Situation in New Delhi | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

दिल्लीतील कोरोना रोखण्यासाठी अमित शहांचे मंत्रालय सरसावले

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 19 नोव्हेंबर 2020

दिल्लीतील वाढते कोरोना संक्रमण रोखण्यासाठी गृहमंत्रालयाने पुन्हा सुत्रे हाती घेतली असून खासगी रुग्णालयांच्या अतिदक्षता विभागांमधील खाटांच्या उपलब्धतेसाठी दहा पथके तयार करण्यात आली आहेत. ही पथके १०० खासगी रुग्णालयांमध्ये पाहणी करतील.

नवी दिल्ली  : दिल्लीतील वाढते कोरोना संक्रमण रोखण्यासाठी गृहमंत्रालयाने पुन्हा सुत्रे हाती घेतली असून खासगी रुग्णालयांच्या अतिदक्षता विभागांमधील खाटांच्या उपलब्धतेसाठी दहा पथके तयार करण्यात आली आहेत. ही पथके १०० खासगी रुग्णालयांमध्ये पाहणी करतील. यासोबतच डीआरडीओ (संरक्षण संशोधन विकास संस्था) आपल्या विशेष कोरोना रुग्णालयामध्ये २५० आयसीयु खाटांमध्ये आणखी २५० आयसीयु खाटांचा समावेश करणार आहे.

गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी (ता. १५) बैठक घेतली होती. त्यात विविध उपाययोजनांवर विचारमंथन करण्यात आले होते. त्यापार्श्वभूमीवर गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीत रुग्णांवरील उपराचाराची गरज भागविण्यासाठी दिल्ली विमानतळानजीकच्या डीआरडीओच्या रुग्णालयात अतिरिक्त २५० आयसीयु खाटांबरोबरच ३५ बायपेप खाटा देखील बसविण्यात येणार आहेत. या रुग्णालयासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ३५ बायपेप यंत्रे दिली असून दिल्ली सरकारच्या आरोग्य मंत्रालय देखील २५ बायपेप यंत्रे देणार आहे.

तसेच केंद्रीय सशस्त्र पोलिस सेवेअंतर्गत येणाऱ्या ४५ डाॅक्टर आणि १४० वैद्यकीय कर्मचारी असा ताफा डीआरडीओ रुग्णालय आणि छतरपूरच्या कोविड केअर सेंटरमध्ये पाठविण्यात आला आहे. यासोबतच रेल्वे प्रशासनानेही रुग्णसेवेसाठी रेल्वेचे कोच देण्याची तयारी केली आहे. शकूरबस्ती रेल्वे स्थानकावर ८०० खाटांची सोय असलेले कोच लावले जातील. या ठिकाणी सशस्त्र पोलिस सेवेच्या डाॅक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात येणार आहे. यासोबतच, भारत हेवी इलेक्ट्राॅनिक्स लिमिटेडने २५० व्हेंटिलेटर पाठविले असून येत्या तीन ते चार दिवसात ते दिल्लीत पोहोचतील.

दरम्यान, कोरोनाच्या संसर्गाची तीव्रता तपासण्यासाठी घरोघरी सर्वेक्षण करण्याचीही रणनिती सरकारने आखली असून २५ नोव्हेंबरपर्यंत ती पूर्ण करण्याचे उद्दीष्ट आहे. त्यासाठी आयसीएमआर (भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद) दिल्ली सरकारच्या मदतीने १० मोबाईल चाचणी प्रयोगशळा सुरू करणार आहे. तसेच दिल्लीतील प्रयोगशाळांची चाचणी क्षमता वाढविण्यासाठी मनुष्यबळही वाढविले जाणार असल्याचे गृह खात्यातर्फे सांगण्यात आले आहे.
Edited By - Amit Golwalkar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख