आधी सत्य जाणून घ्या, नंतर बोला... 'त्या' सेलिब्रिटींना केंद्र सरकारने खडसावले - Central Government slams Celebrities over comments on farmer protest | Politics Marathi News - Sarkarnama

आधी सत्य जाणून घ्या, नंतर बोला... 'त्या' सेलिब्रिटींना केंद्र सरकारने खडसावले

वृत्तसंस्था
बुधवार, 3 फेब्रुवारी 2021

हॉलिवूडची पॉप स्टार रिहाना आणि पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग यांनी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरून अनेकांनी या आंदोलनाला समर्थन दिले. ही बाब गांभीर्याने घेत केंद्र सरकारने संबंधितांना कडक शब्दांत सुनावले आहे.

नवी दिल्ली : हॉलिवूडची पॉप स्टार रिहाना आणि पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग यांनी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरून अनेकांनी या आंदोलनाला समर्थन दिले. ही बाब गांभीर्याने घेत केंद्र सरकारने संबंधितांना कडक शब्दांत सुनावले आहे. 'कोणतेही वक्तव्य करण्यापूर्वी आधी सत्त जाणून घ्यावे. मुद्दा व्यवस्थित समजून घ्यावा. प्रसिध्दीसाठी सोशल मिडियावरील हॅशटॅगच्या लोभात पडणे बेजबाबदार आहे,' असे केंद्र सरकारने म्हटले आहे.

कृषी कायद्यांविरोधात दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. एकीकडे शेतकरी मागे हटण्यास तयार नाहीत, तर दुसऱ्या बाजूला सरकारही आपल्या भूमिकेवर ठाम आहे. दिल्लीत ट्रॅक्टर मोर्चादरम्यान झालेल्या मोठ्या हिंसाचारानंतर केंद्र सरकारने सीमेवरील सुरक्षा कडक केली आहे. या आंदोलनाला अनेक बॉलिवूड कलाकारांनी पाठिंबा दर्शविला आहे. 

आता हॉलिवूडची पॉप स्टार रिहाना हिनेही शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात एक ट्विट केलं आहे. तसेच ग्रेटा थनबर्ग हिनेही शेतकऱ्यांच्या बाजूने ट्विट केल्याने वाद निर्माण झाला आहे. त्यानंतर केंद्र सरकारने तातडीने निवेदन प्रसिध्दीस देत प्रामुख्याने सेलिब्रिटीजला सुनावले आहे. तसेच #IndiaTogether आणि #IndiaAgainstPropaganda हे हॅशटॅग तयार करून संपुर्ण भारत एकसाथ असल्याचा संदेश देण्यात आला आहे. 

खूप छोट्या भागातून आलेले हे शेतकरी असल्याचे सांगत केंद्र सरकारने म्हटले आहे की, कृषी क्षेत्रात विविध सुधारणांबाबतच्या या कायद्यांना पूर्ण चर्चा केल्यानंतरच संमत करण्यात आले आहे. कायद्यांमध्ये करण्यात आलेल्या सुधारणांमुळे शेतकऱ्यांना बाजारात माल नेणे अधिक सोपे होणार आहे. ही सुविधा अधिक लवचिक करण्यात आली आहे. 

भारताच्या काही छोट्या भागातील शेतकऱ्यांना कायद्यांबाबत काही संभ्रम आहे. आंदोलक शेतकऱ्यांचा आम्ही सन्मान करत असून त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. सरकारने कायद्यांची अंमलबजावणी स्थगित करण्याचा प्रस्तावही ठेवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या अॉफरचा पुनर्रुच्चार केला आहे, असेही नमूद करण्यात आले आहे.

शेतकरी आंदोलनाला परदेशातून भडकविले जात असल्याच्या मुद्दयावर केंद्र सरकारने म्हटले आहे की, या आंदोलनाचा फायदा उठविण्याच्या उद्देशाने काही संघटनांनी भारताविरूध्द आंतरराष्ट्रीय मदत मिळविण्याचा प्रयत्नही केला आहे. हे दुर्दैवी आहे. ही फुटीरतावादी शक्तींना भडकावण्यासाठी जगातील अनेक भागांतील महात्मा गांधींच्या पुतळ्यांची मोडतोड करण्यात आली. हा भारतासाठी चिंतेचा विषय आहे. पोलिसांनी या आंदोलनाला अत्यंत संयमाने नियंत्रित केले. पण शेकडो पोलिसांवर हल्ले करण्यात आले, असेही केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. 

Edited By Rajanand More
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख