मोठी बातमी : सीबीएसईची दहावीची परीक्षा रद्द, बारावीची लांबणीवर - CBSE Board Exams for Class 10th cancelled & 12th postponed | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

मोठी बातमी : सीबीएसईची दहावीची परीक्षा रद्द, बारावीची लांबणीवर

वृत्तसंस्था
बुधवार, 14 एप्रिल 2021

सीबीएसईकडून काही निकषांच्या आधारे दहावीचा निकाल लावला जाणार आहे. 

नवी दिल्ली : देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज विक्रमी वाढ होत चालली आहे. त्यामुळे अनेक राज्यांनी दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) परीक्षाही पुढे ढकलण्याची विनंती महाराष्ट्रासह काही राज्यांनी केली होती. या सर्व गोष्टींचा विचार करून केंद्र सरकारने सीबीएसईची इयत्ता दहावीची परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली आहे. तसेच बारावीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांना दिलाला मिळाला आहे. 

देशात दररोज पावणे दोन लाखांहून अधिक नवीन कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. पहिल्या लाटेच्या तुलनेत सध्याची वाढ प्रचंड वेगाने होत आहे. देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसह दहावी व बारावीच्या परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. या परीक्षा जून महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे राज्याने केंद्र सरकारकडे सीबीएसई परीक्षा पुढे ढकलण्याचीही मागणी केली होती. तसेच दिल्ली, पंजाबसह अन्य राज्यांनीही या परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केंद्राल केली होती. या परीक्षा ता. 4 मे पासून सुरू होणार होत्या. 

यानुषंगाने पंतप्रधानु नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज उच्चस्तरीय बैठक झाली. केंद्रीय शिक्षण मंबी रमेश पोखरीयाल निशंक यांच्यासह शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारीही बैठकीला उपस्थित होते. विद्यार्थ्यांची सुरक्षितता हे सरकारचे प्राधान्य असल्याचे पंतप्रधानांनी बैठकीत स्पष्ट केले. तसेच त्यांच्या शैक्षणिक नुकसानही होऊ दिले जाणार नाही, असे स्पष्ट करत बैठकीत परीक्षांबाबत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्यानुसार दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली असून बारावीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. 

असा लावणार दहावीचा निकाल

दहावीची परीक्षा रद्द करण्यात आल्याने विद्यार्थी व पालकांना निकालाची चिंता सतावणार आहे. कारण मंडळाने निकाल लावण्यासाठी एक वस्तुनिष्ठ निकष ठरविला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना गुण दिले जातील. याबाबत मंडळाकडून अद्याप स्पष्टता करण्यात आलेली नाही. त्यामुळे नेमका निकाल लावताना कोणत्या गोष्टींचा विचार होणार, हे गुलदस्त्यात आहे. 

...तर दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार

मंडळाने निकषानुसार निकाल लावल्यानंतर विद्यार्थी त्याबाबत असमाधानी असतील तर त्यांना परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर परीक्षेबाबतचा निर्णय घेतला जाईल. त्यावेळी संबंधित विद्यार्थ्यांना परीक्षा देता येईल. असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. 

बारावी परीक्षेचा निर्णय एक जूननंतर

इयत्ता बारावी परीक्षेचा निर्णय 1 जूननंतर घेतला जाणार आहे. कोरोनाची त्यावेळची स्थितीचा आढावा घेण्यात येईल. त्यानंतर परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना किमान 15 दिवस आधी कळविले जाईल, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.  

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख