Captain says, 'Now is the time for Modi government to answer China' | Sarkarnama

कॅप्टन म्हणतात, 'चीनला उत्तर देण्याची वेळ आता मोदी सरकारची' 

वृत्तसंस्था
मंगळवार, 30 जून 2020

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. आम्ही 1948, 1965, 1971 आणि 1999 मधील युद्ध जिंकले. चीनच्या अतिक्रमणाला उत्तर देण्याची वेळ आता तुमची आहे.

चंदीगड : पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर  सिंग यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. आम्ही 1948, 1965, 1971 आणि 1999 मधील युद्ध जिंकले. चीनच्या अतिक्रमणाला उत्तर देण्याची वेळ आता तुमची आहे. चीनबरोबर संघर्षाची गलवानमधील ही पहिलीच घटना नाही. चीनबरोबर आपले 1960 पासून तणावपूर्ण संबंध आहेत. 

कॅप्टन  सिंग यांनी म्हटले की आम्ही 1948, 1965, 1971 आणि 1999 मध्ये झालेल्या युद्धात विजय मिळविला आहे. आता त्यांची (नरेंद्र मोदी सरकार) वेळ आहे. त्यांनी चीनच्या अतिक्रमणाला प्रतित्त्युर दिले पाहिजे. चीनबरोबर 60 च्या दशकापासून आपले संषर्घपूर्ण संबंध आहेत. मला विश्‍वास आहे की भारत सरकार सीमेवरील सैनिकांची संख्या वाढवत आहे. 

 

मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे की, भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने चिनी कंपन्यांकडून पंतप्रधान केअर्स फंडाला मिळालेला निधी तातडीने परत करावा. चीनच्या विरोधात आपण कठोर पावले उचलायला हवीत. सीमेवर आपले सैनिक हुतात्मा होत असताना आपण चिनी कंपन्यांकडून पैसे घ्यावेत, हे मला योग्य वाटत नाही. 

महत्त्वाचे म्हणजे, पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात 15-16 जूनच्या मध्यरात्री चिनी सैनिकांसोबत झालेल्या झटापटीत आपले 20 जवान हुतात्मा झाले आहेत. असे असताना आपण चिनी कंपन्यांकडून पैसे घेणे अयोग्य आहे. "पीएम केअर्स'ला निधी देणाऱ्या काही चिनी कंपन्यांची नावेही मुख्यमंत्री अमरिंदर  सिंग यांनी या पत्रकार परिषदेत घेतली. 

ते म्हणाले की, किती पैसे आले, हा महत्त्वाचा प्रश्‍न नाही. ते (चीन) सध्याची जागतिक महामारी कोविड-19 याला जबाबदार असून आपल्या देशाविरोधातही त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. अशा वेळी आपण त्यांच्या कंपन्यांकडून एक रुपयाही घेऊ नये. 

कॅप्टन पुढे म्हणाले की, चिनी कंपन्यांकडून मिळालेला निधी त्यांना परत करण्याची सध्याची वेळ आहे. स्वतःची काळजी घेण्यासाठी भारताला सध्या चीनच्या पैशांची गरज नाही.

चीनशी मोदींचे नेमके काय साटेलोटे : कॉंग्रेसचा सवाल

मुंबई : चीनने भारताच्या हद्दीत घुसखोरी करून गलवान खोरे, पेंगॉग तलाव परिसर, हॉट स्प्रिंग व वाय जंक्‍शन भागात लष्कराची जमवाजमव केली आहे. चिनीसैन्याबरोबर झालेल्या झटापटीत आपले 20 जवान हुतात्मा झाले आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून चीन सीमेवर तणाव असताना अनेक चिनी कंपन्यांनी पंतप्रधान केअर्स फंडाला कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीन यांचे नेमके काय साटेलोटे आहे? याचा खुलासा सरकारने करावा, अशी मागणी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. 

संगमनेर (जि. नगर) येथे पत्रकारांशी बोलताना थोरात म्हणाले की,  चीन सीमेवर 20 जवान हुतात्मा होऊनही मोदी सरकार आपल्या भ्रामक विश्वातून बाहेर यायला तयार नाही. चीनने भारतीय हद्दीत घुसखोरी केली नाही, असा दावा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाची दिशाभूल करीत आहेत. हे देशासाठी घातक आहे. 

राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने सर्वात चिंताजनक व गंभीर बाब म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनच्या कंपन्यांकडून पीएम केअर फंडासाठी घेतलेल्या देणग्या. या पीएम केअर फंडाची कार्यात्मक चौकट काय आहे? घटनेच्या कोणत्या कलमात हा फंड येतो, याची कोणालाही माहिती नाही. 

आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, 20 मे 2020 पर्यंत या पीएम फंडात 9678 कोटी रुपये जमा झाले आहेत. अनेक चीनी कंपन्यांनी या पीएम केअर्स फंडाला मोठा निधी दिला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख