संपूर्ण दिल्लीत तीन महिन्यातच लसीकरण पूर्ण करू; मात्र... - can vaccinate entire delhi in 3 months if center relaxes vaccine parameters; Arvind Kejriwal | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

संपूर्ण दिल्लीत तीन महिन्यातच लसीकरण पूर्ण करू; मात्र...

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 18 मार्च 2021

लशींच्या मापदंडात केंद्राने थोडी शिथिलता आणली तर दिल्लीतील एकही व्यक्ती कोरोनाच्या लशीपासून वंचित राहणार नसून पुढील तीन महिन्यात सर्व दिल्लीकरांना लस उपलब्ध होईल, अशी माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरूवारी दिली. 

नवी दिल्ली: कोरोनाच्या लशीचे मापदंड केंद्राने ठरवून दिले आहे. लशींच्या मापदंडात केंद्राने थोडी शिथिलता आणली तर दिल्लीतील एकही व्यक्ती कोरोनाच्या लशीपासून वंचित राहणार नसून शेवटच्या व्यक्तीपर्यंत ती पोहोचणार असून पुढील तीन महिन्यात सर्व दिल्लीकरांना लस उपलब्ध होईल, अशी माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरूवारी दिली. 

केजरीवाल म्हणाले, दिल्लीमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. एक काळ आला होता की दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या प्रतिदिवस अवघ्या १०० ते १२५ रुग्णांपर्यंत खाली आली होती. परंतु, गेल्या काही दिवसांपासून दररोज पाचशेच्यावर कोरोनाच्या रुग्णांची संख्या जात असून ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे केंद्राने दिल्लीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. 

कोरोनाची लस घ्या, असे आवाहन दिल्लीकरांना करताना केजरीवाल म्हणाले, लशीसाठी पात्र नागरिकांनी ती तातडीने घ्यावी. ही लस सुरक्षित असून दररोज ३० ते ४० हजार जणांचे लसीकरण केले जात आहे. हा आकडा वाढवत दररोज सव्वा लाख दिल्लीकरांना कोरोनाची लस देण्याचे उद्दिष्ट आहे. दिल्लीमध्ये सुमारे ५०० केंद्रांवर लसीकरण करण्यात येत असून येत्या काही दिवसांत यामध्ये दुपटीने वाढ करण्याचे विचाराधीन असल्याचेही केजरीवाल यांनी नमूद केले. सरकारी केंद्रांच्या वेळेत वाढ केली असून आता सकाळी ९ ते रात्री ९ दरम्यान लसीकरण करण्यात येत असून नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही केजरीवाल यांनी केले. केंद्राने लशीसंदर्भात काही क्लिष्ट अटी काढून टाकल्यास एकही दिल्लीकर लशीपासून वंचित राहणार नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.  

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख