भाजपच्या सभेचा फज्जा; फलकावर सात, स्टेजवर पाच नेते अन् समोर एकच... - BJPs flop meeting photo viral in social media | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपच्या सभेचा फज्जा; फलकावर सात, स्टेजवर पाच नेते अन् समोर एकच...

वृत्तसंस्था
रविवार, 21 फेब्रुवारी 2021

भाजपच्या फ्लॉप सभेचे छायाचित्र सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे.

नवी दिल्ली : देशात पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, आसाम आणि पुदुच्चेरी या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका पुढील दोन-महिन्यांत होण्याची शक्यता आहे. त्यासाठी सर्वच पक्षांकडून मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सभा, बैठका, विविध उपक्रम, कार्यक्रमांच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित केले जात आहे. अशाच एका भाजपच्या फ्लॉप सभेचे छायाचित्र सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे. काँग्रेसचे नेते खासदार शशी थरूर यांनीही हे छायाचित्र ट्विट केले आहे.

पश्चिम बंगालमधील निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. ठिकठिकाणी सभा, विविध कार्यक्रम घेतले जात आहेत. सध्या राज्यात परिवर्तन यात्राही काढण्यात आली आहे. सोशल मिडियावर व्हायरल झालेले छायाचित्र बंगालमधीलच असल्याचे बोलले जात आहे.

छायाचित्रामध्ये एका भल्या मोठ्या मैदानावर भाजपची सभा सुरू असल्याचे दिसते. सभेच्या स्टेजवर पाच नेते दिसत आहेत. तर मागील फलकावर सहा-सात नेत्यांचे छायाचित्र आहे. स्टेजच्या समोरही काही मोजक्याच खुर्च्या आहेत. पण केवळ एकच व्यक्ती समोर बसल्याचे दिसत आहे. त्याच्यासमोरच एका वक्त्याचे भाषण सुरू असल्याचे छायाचित्रात दिसते. 

हेही वाचा : मोदी सरकारकडून पद्मश्री जाहीर, पण शरीफ चाचा वर्षभरानंतरही वंचित...

काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी हे छायाचित्र ट्विट केले आहे. त्यासाठी त्यांनी '#PThepartyIsOver' हा हॅशटॅग वापरला आहे. तसेच 'स्टेजवर पाच लोक, चित्रात सात नेते. प्रेक्षकांमध्ये एक व्यक्ती. आणि हे केरळमध्येही नाही,' असेही त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे. या ट्विटला अनेक नेटकऱ्यांनी लाईक तसेच शेअर केले आहे. त्याचप्रमाणे अनेकांनी शरूर यांची विविध छायाचित्र, व्हिडिओ टाकून त्यांची फिरकीही घेतली आहे. 

निवडणुकीच्या तोंडावर भाजपला धक्का...

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप अडचणीत आल्याचे चित्र आहे. भाजपच्या महिला नेत्यालाच अमली पदार्थांसह अटक झाली आहे. त्या नेत्याला अटक होण्यामागे तिचे स्वपक्षातील विवाहित नेत्याशी असलेले प्रेमसंबंध कारणीभूत ठरल्याचे समोर आले आहे. याबाबत तिच्या वडिलांनीच पोलिसांकडे केलेल्या तक्रारीतून ही बाब उघड झाली आहे. 

भारतीय जनता युवा मोर्चाच्या राज्य सरचिटणीस पामेला गोस्वामी यांना अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पामेला, युवा मोर्चाचा नेता प्रबीर डे यांना सुरक्षारक्षकासह दक्षिण कोलकत्यातील न्यू अलिपूर परिसरातून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे 100 ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. त्याची किंमत सुमारे 10 लाख रुपये आहे. 

Edited By Rajanand More
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख