विधान परिषदेच्या सभापतिपदावर भाजपचा डोळा 

भाजपला सभापतिपद मिळवून देण्याचा राजकीय डाव आखण्यात येत आहे.
विधान परिषदेच्या सभापतिपदावर भाजपचा डोळा 
BJP's eye on the chairmanship of the Legislative Council

बंगळूर : अलीकडील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर धजदने सत्ताधारी भारतीय जनता पक्षाशी हातमिळवणी करण्यास पुढाकार घेतला आहे. धजदचा पाठिंबा मिळवून विधान परिषदेच्या सभापतिपदावर भाजपने आता आपली नजर ठेवली आहे. 

अलिकडेच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपने सर्व चारही मतदारसंघात विजय मिळविला आहे. धजदच्या पाठिंब्यावर सभापतिपदावर आरुढ झालेले कॉंग्रेसचे प्रताप चंद्रशेट्टी यांना खाली खेचून भाजपला सभापतिपद मिळवून देण्याचा राजकीय डाव आखण्यात येत आहे. 

नुकताच बंगळूर शिक्षक क्षेत्र, पश्‍चिम पदवीधर मतदार संघ आणि दक्षिणपूर्व शिक्षक क्षेत्र जिंकणारा भारतीय जनता पक्ष हा विधानसभेचा सर्वात मोठा पक्ष आहे. विधान परिषदेत भाजप, कॉंग्रेस, धजद, अपक्ष आणि सभापतींसह एकूण 75 सदस्य आहेत. विधान परिषदेच्या नुकत्याच झालेल्या चारही जागा जिंकल्याने भाजप सभागृहातील सर्वांत मोठा पक्ष झाला आहे. 

विधानपरिषदेत सध्या भाजप 31, कॉंग्रेस 28, धजद 14, अपक्ष 1, सभापती 1 असे संख्याबळ आहे. साध्या बहुमतासाठी 38 सदस्यांचा पाठिंबा आवश्‍यक आहे. भाजप व धजद एकत्र आल्यास भाजप सभापतिपद हिसकावून घेऊ शकते. कॉंग्रेस व धजद युती सरकारच्या काळात कॉंग्रेसचे प्रतापचंद्र शेट्टी सभापती होते, तर धजदचे एस. एल. धर्मेगौडा उपसभापतीपदावर आरुढ झाले होते. 

धजदने जर भाजपशी हातमिळवणी केली, तर धजदचे उपसभापती धर्मेगौडा यांचे पद कायम राहण्याची शक्यता आहे. भाजपने या संदर्भात धजद नेत्यांशी चर्चा केली असल्याचे समजते. पुढील विधिमंडळाच्या अधिवेशनात कॉंग्रेसचे विद्यमान सभापती प्रताप चंद्रशेट्टी यांना खाली खेचण्याची योजना आखण्यात आल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in