पंतप्रधान मोदींच्या पुतणीलाच भाजपनं नाकारलं महापालिकेचं तिकीट - BJP rejects Municipal corporation ticket to PM Narendra Modis nephew | Politics Marathi News - Sarkarnama

पंतप्रधान मोदींच्या पुतणीलाच भाजपनं नाकारलं महापालिकेचं तिकीट

वृत्तसंस्था
शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021

गुजरातमध्ये महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुतणी सोनल मोदी यांना अहमदाबाद महापालिकेची निवडणूक लढविण्याची इच्छा होती.

अहमदाबाद : गुजरातमध्ये महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुतणी सोनल मोदी यांना अहमदाबाद महापालिकेची निवडणूक लढविण्याची इच्छा होती. त्यांनी भाजपकडे तिकीटही मागितलं होतं. पण पक्षाने उमेदवारीसाठी लावलेल्या नवीन नियमांच्या आधारे त्यांना तिकीट नाकारलं आहे.

भाजपसह सर्व राजकीय पक्षांमध्ये घराणेशाही दिसून येते. त्यावरून अनेकदा टीकाही होती. गुजरातमध्ये महापालिका निवडणुकींची रणधुमाळी सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुतणी सोनल मोदी यांनी अहमदाबादच्या बोदकदेव वॉर्डातून भाजपकडं तिकीट मागितले होते. पण पक्षाने प्रसिध्द केलेल्या उमेदवारी यादीमध्ये त्यांचे नाव नसल्याचे समोर आले आहे.

सोनल मोदी या पंतप्रधान मोदींचे बंधू प्रल्हाद मोदी यांच्या कन्या आहेत. मागील काही वर्षांपासून त्या पक्षामध्ये सक्रीय आहेत. सोनल यांना उमेदवारांसाठीच्या नवीन नियमांमुळे तिकीट नाकारण्यात आल्याचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

गुजरात भाजपने पक्षातील नातेवाईकांचा विचार उमेदवारीसाठी केला जाणार नसल्याचे नुकतेच जाहीर केले आहे. हाच नियम सोनल यांनाही लावण्यात आला आहे. तसेच तीन वेळा नगरसेवक असलेले आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या कार्यकर्त्यांनाही उमेदवारी देणार नसल्याचे पक्षाने आधीच स्पष्ट केले आहे. 

पंतप्रधान मोदींची पुतणी म्हणून नव्हे तर भाजपची कार्यकर्ता म्हणून मी उमेदवारी मागितल्याचा दावा सोनल मोदी यांनी केला आहे. मला तिकीट मिळाले नसले तरी पक्षाची सक्रीय कार्यकर्ती म्हणून काम करत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे. 

दरम्यान, गुजरात भाजपने गुरूवारी अहमदाबाद, सुरत, वडोदरा, राजकोट, जामनगर आणि भावनगर या सहा महापालिकांतील उमेदवारांची अंतिम यादी प्रसिध्द केली. या यादीमध्ये 576 उमेदवारांचा समावेश आहे. या महापालिकांची निवडणूक 21 फेब्रुवारी रोजी होणार आहे. तर 28 फेब्रुवारीला 81 नगरपालिका, 31 जिल्हा परिषद, 231 पंचायत समित्यांची निवडणूक होणार आहे. 

Edited By Rajanand More
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख